सिंधुदुर्ग today
'साहित्य-कला प्रतिष्ठान, महाराष्ट्र' संस्थेची स्थापना
अध्यक्षपदी सायमन मार्टिन, कार्याध्यक्षपदी अजय कांडर, कार्यवाहपदी उदय जाधव.
कणकवली / प्रतिनिधी
कोकण - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवून साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्य करण्याच्या उद्देशाने 'साहित्य-कला प्रतिष्ठान, महाराष्ट्र' या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी तथा या वर्षीच्या २७ व्या अखिल भारतीय ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सायमन मार्टिन यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर, तर प्रमुख कार्यवाहपदी नाट्यलेखक-दिग्दर्शक उदय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई दादर येथे संस्थेच्या स्थापनेनिमित्त आयोजित बैठकीमध्ये नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर, सहकार्यवाहपदी साहित्य संशोधक डॉ. निर्मोही फडके, तर सदस्य म्हणून चित्रपट-पटकथा लेखिका रूपाली कुटे, कादंबरीकार गोपाळ रायबोले आणि चित्रकार, नाट्य अभिनेते स्वप्निल जाधव यांची निवड करण्यात आली. संस्थेत सहभागी झालेले सर्व पदाधिकारी साहित्य, नाटक, चित्रपट या क्षेत्रांत स्वतःचे असे स्थान निर्माण केलेले आहेत.
मराठी साहित्यासह विविध कलाक्षेत्रांत प्रसिद्धीपासून दूर राहून अत्यंत गंभीरपणे काम करणारे अनेक कलावंत आहेत. सांस्कृतिक बाजारीकरणापासून दूर राहणाऱ्या अशा कलावंतांना व्यासपीठ देणे आणि विविध माध्यमांतून त्यांचा गौरव करणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. संस्थेची मुख्य संकल्पना मांडणारे कवी अजय कांडर यांनी वैचारिक भूमिकेशी बांधिलकी ठेवून, अत्यंत गांभीर्याने संस्था कार्यरत ठेवण्याचा निर्धार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, २०२६-२७ मध्ये संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत दादर येथील बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नाटक, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींचा गौरव करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. त्याची घोषणा पुढील पंधरा दिवसांत करण्यात येणार आहे. तसेच साहित्य, नाटक, चित्रपट, सामाजिक आदी विषयांवर विविध कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचाही निर्णय घेण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क - उदय जाधव, कार्यवाह - ९८२०८३२६१९, डॉ. निर्मोही फडके, सहकार्यवाह - ९९२०१४६७११.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा