सिंधुदुर्ग today
नांदगाव घरफोडीतील सराईत चोरटा जेरबंद.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विरार येथून केले जेरबंद.
कणकवली : प्रतिनिधी
नांदगाव येथील घरफोडीप्रकरणातील सराईत चोरट्याला सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विरार येथून जेरबंद केले. चोरट्याकडून दोन्ही मोबाईल तसेच स्मार्ट वॉच हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूवीर्ही घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एलसीबीच्या पथकाने सराईत चोरट्याला विरारमधून जेरबंद केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१७ जुलै रोजी नांदगाव येथे फिर्यादी दिनेश कोरगांवकर तसेच त्यांचे शेजारी नितेश रमेश देवळे यांच्या घरांच्या दर्शनी दरवाज्याची कडी अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश केला होता. या घरफोडीत दोन मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम, स्मार्ट वॉच तसेच महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण ५३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाती घेतला होता. कोणताही ठोस धागादोरा हाती नसताना एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी विरार परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने विरार (पूर्व), जि. पालघर येथे सापळा रचला. त्यानंतर राजू तुकाराम सुतार (वय ३५, मूळ रा. नाधवडे, ता. वैभववाडी) याला ५ आॅगस्टला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. एलसीबीच्या पथकाने केलेल्या चौकशीत आरोपीने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल तसेच स्मार्ट वॉच हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग तसेच मुंबई परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी आणि चोरीचे एकूण दहा गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या सूचनेनुसार व प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहाय्यक फौजदार राजेंद्र जामसंडेकर, हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा