सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा मुस्लिमवाडी येथे भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे अजगराला जीवदान
रज्जाक बटवाले यांच्या घरासमोर रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास अजगराचे दर्शन; सर्पमित्रांनी सुरक्षितरीत्या पकडून जंगलमय भागात सोडले.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील मुस्लिमवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास एका भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मुस्लिमवाडी येथील रहिवासी रज्जाक बटवाले यांच्या घरासमोर रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अजगर आढळून आला.
अचानक घरासमोर भला मोठा अजगर दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रसंगावधान राखत रज्जाक बटवाले यांनी तात्काळ सर्पमित्र पंढरी वायंगणकर यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र पंढरी वायंगणकर, विठ्ठल बिडये आणि रिद्धेश तेली यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने या भल्या मोठ्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. त्यानंतर अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासाला अनुकूल असलेल्या जंगलमय भागात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
या बचावकार्यात रज्जाक बटवाले, यासिर मास्के आणि उस्मान बटवाले यांनीही मोलाचे सहकार्य केले. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे अजगराला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडणे शक्य झाले.
सर्पमित्रांनी दाखवलेली तत्परता, धाडस आणि वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता यांचे परिसरातून कौतुक होत आहे. साप किंवा अजगर आढळल्यास घाबरून न जाता अथवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचा संदेश देणारी ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा