सिंधुदुर्ग today



बाबासाहेब समजून घेण्यासाठी आधी त्यांच्या विरोधकांना समजून घ्यायला हवे

बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन.

राजापूर / प्रतिनिधी

        ज्या लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध केला, तेच लोक आता ‘बाबासाहेब आमचे’ म्हणत आहेत. जे संविधानाला विरोध करत आहेत, तेच ‘संविधान वाचवा’ रॅली काढत आहेत. अशा संघर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेबांना समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्या विरोधकांनाच आधी समजून घ्यावे लागेल. मात्र अशा प्रकारे विचारांची आणि मूल्यांची सरमिसळ करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या कुणालाच बाबासाहेब झेपणार नाहीत, असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभलेखक अजय कांडर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत केले.

        राजापूर ओणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे ओणी नूतन विद्यालयाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. यात ‘बाबासाहेब समजून घेताना’ हे पहिले पुष्प गुंफताना कांडर यांनी, बाबासाहेबांना वगळून कोणालाच भारतीय राजकारण करता येणार नाही, असाही सूचक इशारा दिला.संस्था अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्याख्यानाच्या वेळी अ‍ॅड. गुरुदत्त खानविलकर, सूर्यकांत सुतार, डॉ. शैलेश शिंदे देसाई, गणपत भारती, गणपत जानस्कर, अ‍ॅड. एकनाथ मोंडे, संजय कुळये आणि प्राचार्य विनोद मिरगुले उपस्थित होते.

         कांडर म्हणाले, बाबासाहेब समजून घेताना बाबासाहेबांच्या काही अनोख्या कृतिशील विचारांनी माझ्यावर प्रभाव टाकला. त्यातून मी जात आणि धर्ममुक्त झालो व नास्तिकही बनलो. हे बाबासाहेबांचे माझ्यावर मोठे ऋण आहेत.जात-धर्म नाकारणाऱ्या वर्गाकडे समाज संशयाने बघतो. पण बाबासाहेबांनीच या समाजाला डोळ्याला डोळा भिडवून कसे जगायचे, हे शिकवले. खरं तर बाबासाहेबांच्या किंवा बुद्ध विचाराची कास आपण धरली की असे जगणे फारच सोपे असते. कारण बाबासाहेबांच्या विचाराने जगणे म्हणजेच नैसर्गिक जगणे. अर्थात नैसर्गिक जगणे म्हणजे भेदाची सर्व प्रकारची परंपरा नाकारत फक्त माणूस म्हणून जगणे. म्हणूनच मला फक्त एकट्या बाबासाहेबांच्या रक्तात जात, धर्म आणि देव दिसत नाही.

म्हणतात ना, खरं बोललं तर सख्ख्या आईलाही राग येतो. पण आता खरंच बोलायला पाहिजे. नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपण सगळेच जातीयवादी आहोत. आपल्या कुणाच्याच मनातून अद्याप जात गेलेली नाही. तुम्ही वैदिक जाती-धर्मानुसार सगळ्या गोष्टी करणार आणि बाहेर सांगणार, ‘मी जात मानत नाही’, हा ढोंगीपणा आहे. हा ढोंगीपणा आपण ओळखला पाहिजे.

बाबासाहेबांनी स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवली. स्त्रियांनी शिकले पाहिजे, हेच त्यांचे म्हणणे होते. स्त्रियांनी शिकले तरच समाज प्रगती करेल. स्त्रियांना शिकवले पाहिजे. त्यांना शिक्षणाचा हक्क आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले.

बाबासाहेबांनी स्त्रियांचे हक्क मिळवून देण्यासाठी कधी जात पाहिली नाही. ज्या जातवर्गाने त्यांना त्रास दिला, त्याच जातवर्गातील स्त्रीसाठी ते न्यायालयात गेले. आपण मात्र ‘तो आपल्या जातीतला आहे का? तो आपल्या धर्मातला आहे का? किंवा हा आपल्या गटातला आहे का?’ एवढे शोधण्या इतके संकुचित झालो आहोत. म्हणूनच दुसऱ्या जातीतील एखाद्या कवी-लेखकाने बाबासाहेबांवर एखादा शब्द लिहिला, तरी तो आपल्याला आपला दुश्मन वाटतो. कारण ‘आपली पेस त्याने घेतली’, या संशयानेच आपण संपून जातो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब समजून घेतले, तरच बाबासाहेबांचे विचार आपल्याला खऱ्या अर्थाने कळू शकतात.

      सूर्यकांत सुतार यांनी आभार मानले. वसुदेव तूळसनकर यांच्या हस्ते कवी कांडर यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today