सिंधुदुर्ग today
अल्पवयीन बहिणीवर अत्याचार प्रकरणी सख्खा भावाची सशर्त जामिनावर मुक्तता.
ॲड. प्राजक्ता शिंदे-सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली/ प्रतिनिधी
अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी 50 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली.आरोपीतर्फे ॲड. प्राजक्ता म. शिंदे-सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
कुमार नारायण राठोड, (वय 23 वर्षे, रा. मखनापूर, ता. उत्तर विजापूर, जि. विजापूर, राज्य कर्नाटक ) हा या प्रकरणी संशयित आरोपी असून त्याच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील घरी कोणी नसताना तिचा सख्खा भाऊ कुमार राठोड याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. तो सख्खा भाऊ असल्याने घरात वाद होतील या भीतीने तिने सुरुवातीला कोणालाही याबाबत सांगितले नाही. तसेच पोलीस भावाला अटक करतील या भीतीने सुरुवातीला सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात रोहित सखाराम राठोड आणि निखिल नावाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची खोटी माहिती दिल्याचे तिने नंतरच्या पुरवणी जबाबात सांगितले.या तक्रारीच्या आधारे मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुमार राठोड याला अटक केली. त्या नंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्यानंतर आरोपीतर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर विशेष सत्र न्यायाधीश ओरोस यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि अटींवर आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे-सावंत यांनी न्यायालयात बाजू मांडली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा