सिंधुदुर्ग today



जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि 'महाप्रित' मध्ये सामंजस्य करार.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश; महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम.

सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करा -पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश.

सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर) : 

पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ‘महाप्रित’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात हा करार पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शासकीय इमारती ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने या उपक्रमासाठी आग्रही होते.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी प्रेरीत केल होत.

या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर,महाप्रितचे श्मुख्य अभियंता श्री वहाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

करारानुसार, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळा, अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा योजना इमारती तसेच इतर सर्व शासकीय इमारतींवर सोलार पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे वीज खर्चात मोठी बचत होण्याबरोबरच हरित ऊर्जेचा वापर वाढणार आहे.

प्रकल्पाच्या प्राथमिक टप्प्यात ‘महाप्रित’ कंपनीकडून सर्व संबंधित इमारतींचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष सोलार यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेला आधुनिक, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today