सिंधुदुर्ग today
प्रभा प्रकाशन कणकवली प्रकाशित नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन
अमेरिकास्थित लेखिका पल्लवी शिंदे-माने लिखित ग्रंथ.
कणकवली/प्रतिनिधी
कणकवली इथून सुरू करण्यात आलेल्या प्रभा प्रकाशनच्या अमेरिकास्थित मराठी लेखिका पल्लवी शिंदे माने लिखित 'नीलकांचन ' ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन रविवार 19 एप्रिल रोजी सायं.4 वा. कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ.निर्मोही फडके यांच्या हस्ते सदर ग्रंथाचे प्रकाशन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते पांडुरंग निरंजन भारती आणि चित्रपट दिग्दर्शक विजय शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
प्रभा प्रकाशन कणकवली ही कोकणच्या प्रकाशन क्षेत्रातील आजची अग्रेसर प्रकाशन संस्था असून या संस्थेचे 'निलकांचन ' हे 42 वे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 'नीलकांचन ' या ग्रंथाच्या लेखिका पल्लवी शिंदे माने या मूळच्या कल्याणच्या असून सध्या त्या अमेरिकत स्थायिक झाल्या आहेत. मात्र तरीही अमेरिकेत राहून विविध प्रकारचे साहित्य लेखन त्या सातत्याने करत असतात. यापूर्वी त्यांचे ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांना राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त झाली आहेत. नीलकांचन हा ललित लेखसंग्रहाचा ग्रंथ असून अनेक आठवणींच्या कोलाज मधून या ग्रंथाची शब्दरचना करण्यात आली आहे. छोट्या छोट्या प्रसंगाला हृदयपूर्वक फुलवून मानवी नात्याला अधिक मजबूत करण्याचं काम या लेखनातून मनःपूर्वक करण्यात आले आहे. आठवणींचा भुंगा कधी पाठ सोडत नाही; तर कधी विचाराचं काहून सतत डोक्यात चालू असतं.अशावेळी शब्द जवळ येतात आणि त्या शब्दातून आपल्या भावनांची कोंडी मोकळी करण्याचं काम लेखनातून होत असतं अशा सामर्थ्याने हे लेखन लेखिका पल्लवी शिंदे माने यांनी केल्यामुळे हे लेखन नक्कीच वाचकांच्या पसंतीला पडेल असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा