सिंधुदुर्ग today
विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अनुषंगाने सर्व पक्षांची आढावा बैठक
सिंधुदुर्गनगरी, दि. २० (प्रतिनिधी) :- मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम २०२६च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यावर विशेष भर देण्यात आला. विशेषतः सन २००२ च्या मतदार यादीतील मतदारांचे सध्याच्या यादीशी मॅपिंग करून अचूकता वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच मतदार यादीतील मृत (Dead), दुबार (Duplicate) नावे तसेच स्थलांतरित मतदारांची नावे तातडीने वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मतदार यादी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ओ. (BLO) सोबत राजकीय पक्षांनी बी.एल.ए. (BLA) यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी अद्याप बी.एल.ए. नियुक्त झालेले नाहीत, त्या ठिकाणी तात्काळ नेमणुका करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बी.एल.ओ. आणि बी.एल.ए. यांनी समन्वयाने काम करताना नाव वगळणे किंवा दुरुस्ती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिले.
या मोहिमेबाबत जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की मतदारांच्या सोयीसाठी ज्या मतदान केंद्रांवर १२०० पेक्षा अधिक मतदार आहेत, त्या ठिकाणी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात येणार आहे. याशिवाय, बी.एल.ओ.ना दुबार नावे शोधणे व Enumeration Form भरण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे असेही ते म्हणाले.
एसआयआर (SIR) २०२६ प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना (उबाठा)चे दत्तगुरु विद्याधर पोइपकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, भाजपा जिल्हा कार्यालय मंत्री स्मिता राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सावळाराम अणावकर, शिवसेना जिल्हा सचिव तुकाराम साईल, युवा सेना जिल्हा प्रमुख संग्राम सुधीर साळसकर, युवा सेना उपतालुका प्रमुख मंदार सुहास पडवळ, तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद मधुकर कामत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा