सिंधुदुर्ग today

 


प्रसाद लोके खून प्रकरणी शिवसेना आक्रमक.

आम्ही जनतेच्या बाजूने, तपास सीआयडीकडे द्या -संदेश पारकर

कणकवली प्रतिनिधी 

मिठबाव येथील प्रसाद लोके याचा निर्घृण खून आणि त्याची पत्नी मनवा लोके हिची आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी स्थानिक जनतेची आग्रही मागणी आहे. त्यासाठी मिठबाव ग्रामस्थांनी मोर्चा काढला आहे. शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांशी सहमत आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी शिवसेनेचीही मागणी आहे, आणि ती पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. 

गेल्या वर्षभरात पोलीस यंत्रणा कमालीची अकार्यक्षम झाली आहे. शिवसेना या संदर्भात सातत्याने आवाज उठवीत आहे. स्थानिक पोलीस योग्य पद्धतीने काम करीत नाहीत. सध्या गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांची या खात्यावरील पकड ढिली झाली आहे, हे भाजपच्या माजी आमदार यांनी मोर्चात सहभागी होत सिद्ध केले आहे. प्रसाद लोके प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या कारभारावर भाजपच्याच स्थानिक आमदारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हे प्रकरण सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे. यावरून भाजपच्या अखत्यारीतील पोलीस यंत्रणेवर भाजपच्याच लोकप्रतिनिधींचा विश्वास राहिलेला नाही, हेच सिद्ध होते, असे पारकर म्हणाले. 

मिठबाव व त्या भागात यापूर्वीही झालेल्या अशा प्रकरणांचा तपास मार्गी लागलेलाच नाही. आता

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मात्र आरोपीने वैद्यकीय कारणांची ढाल केली आहे. स्थानिक पोलीस या संदर्भात ठोस माहिती देण्यास कुचराई करीत आहेत. जर आरोपीची प्रकृती ठीक नसेल तर तो एवढी मोठी हत्या एकटा कसा काय करू शकतो? याप्रकरणी अन्य काही आरोपी असल्याचा पोलिसांनाही संशय आहे मग त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोलीस का पोहोचू शकत नाहीत?जिल्ह्यात एखाद्या तरुणाची हत्या आणि त्यानंतर लगेचच मृताच्या पत्नीची आत्महत्या अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. जिल्हावासीय या घटनेमुळे सुन्न झाले आहेत. स्थानिक पोलीस या प्रकारचा तपास करण्यास अक्षम आल्याचा स्थानिक जनतेचा आरोप आहे. आणि स्थानिकांच्या सोबत राहणे हा शिवसेनेचा धर्म आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे. या प्रकरणाच्या संदर्भात दैनंदिन पत्रकार परिषद घेऊन माहिती जनतेला अवगत करावी. आणि आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रकरणाच्या तपासात कोणतीही दिरंगाई अथवा ढिलाई आढळून आल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today