सिंधुदुर्ग today
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाली कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी; डॉ. ऋचा कोतवाल रुजू
जन आरोग्य समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त.
नांदगाव (प्रतिनिधी) :
मुंबई-गोवा महामार्गालगत कणकवली तालुक्यातील महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून ओळख असलेल्या नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता डॉ. ऋचा कोतवाल यांची कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून त्यांनी आज नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष रुजू होत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
यापूर्वी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रामुख्याने कंत्राटी पद्धतीने करण्यात येत होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा कंत्राटी नियुक्तीच्या कालावधीमुळे आरोग्य सेवेच्या सातत्यावर परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी मिळावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती.
डॉ. ऋचा कोतवाल यांनी आज प्रथमच नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हजेरी लावत कार्यभार स्वीकारल्यानंतर जन आरोग्य समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गालगत असल्याने स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांसाठी आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने रुग्णांना वेळेवर वैद्यकीय तपासणी व उपचार मिळण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवेला अधिक स्थैर्य प्राप्त होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीमुळे नांदगाव परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम व दर्जेदार व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी ओटवचे माजी सरपंच तथा जन आरोग्य समिती सदस्य हेमंत परुळेकर, ओटवचे उपसरपंच दुर्गेश ओटवकर, पत्रकार तथा जन आरोग्य समिती सदस्य ऋषिकेश मोरजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई, आरोग्य सहाय्यक दीपक कांबळे, आरोग्य सहायिका श्रीमती पवार ,फार्मासिस्ट श्रीमती कोठुरवार यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवेला आता नवी दिशा मिळेल, अशी आशा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा