सिंधुदुर्ग today
सीमा आणि शशांक मराठे यांना तिसरा 'शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार' जाहीर
शिक्षण, साहित्य व संस्कृती क्षेत्रातील योगदानाचा गौरव; स्व. प्राचार्य शरद विनायक काळे यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले येथे वितरण
कणकवली/प्रतिनिधी
कोकणच्या साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कथाकार शरद काळे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी शिक्षण, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी 'शारदीय प्रतिष्ठान,खारेपाटणतर्फे' प्रतिष्ठेचा 'शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार' दिला जातो. यावर्षीच्या या पुरस्काराने वेंगुर्ले येथील साप्ताहिक 'किरात' चे संपादक शशांक श्रीधर मराठे व सीमा शशांक मराठे या दाम्पत्याला गौरविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक स्व. प्राचार्य शरद विनायक काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ले येथील साई मंगल डीलक्स हॉलमध्ये होणार आहे.स्व. प्राचार्य शरद विनायक काळे यांनी खारेपाटण परिसरात शिक्षण, अध्यापन, साहित्य लेखन, समीक्षा आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात ५६ वर्षे अखंड सेवा केली. त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांनीही स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात बहुमोलाचे योगदान दिले आहे. या दाम्पत्याच्या प्रेरक कार्याचा जागर म्हणून त्यांच्या मुलांनी 'शारदीय प्रतिष्ठान' ची स्थापना केली असून, त्यांच्याच प्रेरणेतून दरवर्षी समाजात निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या आणि कलाप्रिय असणाऱ्या एका दाम्पत्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.५ हजार रुपये रोख, शारदीय प्रेरणा भेट, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार माणगाव येथील डॉ. गौरी व डॉ. गुरुनाथ गणपत्ये आणि तळेरे येथील डॉ. ऋचा व डॉ. मिलिंद कुलकर्णी या दाम्पत्यांना प्रदान करण्यात आला होता. यंदाच्या तिसऱ्या वर्षीचा हा मान वेंगुर्ल्याच्या मराठे दाम्पत्याला मिळत आहे.
मराठे दाम्पत्याने 'किरात' साप्ताहिकाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे कोकणातील साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेची सेवा अविरतपणे सुरू ठेवली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सोहळ्यात 'किरात' मुद्रणालयाचे व्यवस्थापक श्री. मेघश्याम केशव मराठे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुवीर उर्फ भाई मंत्री उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ कथाकार आणि देवगड बी.एड. कॉलेजचे माजी प्राध्यापक प्रा. श्रीराम विनायक काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या कार्यक्रमास साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने चारूता काळे- प्रभुदेसाई, डाॅ.अनुजा काळे- जोशी व कपिल शरद काळे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा