सिंधुदुर्ग today
कवयित्री सुगंधा देवरुखकर यांच्या 'मनश्चक्षू' कवितासंग्रहाचे १३ रोजी कणकवलीत प्रकाशन
कवी अजय कांडर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती
साहित्य संगीत संमेलन समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन.
कणकवली/प्रतिनिधी
साहित्य संगीत संमेलन समिती, सिंधुदुर्ग आणि प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री सुगंधा बाळकृष्ण देवरूखकर लिखित 'मनश्चक्षू' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मंगळवार १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं ४ वा.कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. नामवंत कवी व सुप्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि नगरपंचायत कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कवयित्री सुगंधा देवरुखकर या दीर्घकाळ प्रशासनात कार्यरत होत्या. जिल्हा परिषदेच्या प्रशासन अधिकारी म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या मूळच्या काव्य लेखन आवडीला अधिक वाव देऊन सातत्याने काव्य लेखन केले. त्यातून त्यांच्या या पहिल्या काव्यसंग्रहाची निर्मिती झालेली आहे. प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे हा संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे.या काव्यसंग्रहाला मराठी साहित्याच्या संशोधक डॉ.निर्मोही फडके यांची पाठराखण लाभली असून त्यात त्या म्हणतात, कवयित्रीच्या अनुभवांच्या कक्षेत जितका समकाल आणि भोवताल आला, त्याला त्यांनी कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, त्यांचा परीघ आत्मस्वकीयांपासून मानवी प्रगतीपर्यंत विस्तारलेला दिसतो. 'वादात धर्म पडले, वेदांत धर्म किडले', असं म्हणत आजच्या सांस्कृतिक पर्यावरणातलं प्रदूषण ते वाटेवरचे काटे वेचतानाही गवसणारं माणुसकीचं स्वर्गसुख, इतके व्यापक भाव व्यक्त करणारी ही कविता आहे. ती फक्त 'स्त्री-मुक्ती'चा नव्हे, तर 'माणूस-मुक्ती'चा विचार मांडू पाहते. मात्र जगण्यातल्या अनुभवांचं हे केवळ 'कॉपी-पेस्ट' करणं नाही. त्यावर केलेलं 'भाष्य' आहे, जे कवयित्रीचं आत्मनिवेदन ठरतं. त्यांच्या कवितांचा हा आत्मस्वरापासून समाजस्वरापर्यंत जाण्याचा एक प्रयत्न आहे. अर्थात कवयित्रीला गवसलेली कवितेची ही पाऊलवाट अजिबात सोपी नाही. ह्या प्रवासातल्या खाचखळग्यांचा अंदाज घेत ही कविता नक्कीच हळूहळू पुढे सरकेल.
तरी या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक साहित्य संगीत संमेलन समिती आणि प्रभा प्रकाशन यांच्यावतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क - 94220 65125

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा