सिंधुदुर्ग today
मुंबई मराठी साहित्य संघाचा वि. स. पागे पुरस्कार ॲड.देवदत्त परुळेकर यांना जाहीर.
रोख १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह पुरस्काराचे स्वरुप.
कणकवली /प्रतिनिधी
प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'आजच्या काळासाठी तुकोबा' या सध्याच्या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तथा सिंधुर्गातील संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यास आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा कै. वि. स. पागे अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.पुरस्काराचे स्वरूप रोख १० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे असून, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संत साहित्य, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा सखोल अभ्यास आणि विपुल वाङ्मयीन योगदान लक्षात घेऊन निवड समितीने एकमताने त्यांची निवड केली.ॲड. परुळेकर यांचे संत साहित्यावर आतापर्यंत १० हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यामध्ये 'एक तरी ओवी अनुभवावी' (प्रस्तावना - पद्मश्री मधु मंगेश कर्णिक), 'तुका म्हणे' (प्रस्तावना - डॉ. सदानंद मोरे), 'नामा म्हणे', 'एका जनार्दनी', 'विठोची लेकरे', 'भक्तीचा मळा', 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा', 'आजच्या काळासाठी तुकोबा', वारकरी संतांच्या विवेकी विचारांवरील १८ पुस्तिकांची ग्रंथमाला आणि इंग्रजी ई-बुकचा समावेश आहे. त्यांच्या पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.ॲड. परुळेकर हे बॅ. नाथ पै सेवांगण, मालवणचे अध्यक्ष, मुक्तांगण, वेंगुर्लाचे संचालक, संत विचार अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असून वेंगुर्ला नगर वाचनालयाचे उपाध्यक्ष आहेत. राष्ट्र सेवा दल आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात पुरोगामी चळवळीत सक्रिय काम केले आहे.
यापूर्वी त्यांना कोकण मराठी साहित्य परिषद, डॉ. प्र. न. जोशी संतसाहित्य पुरस्कार, कोल्हापूर येथील संत गाडगेबाबा अध्यासनाचा विशेष पुरस्कार, बांदा नट वाचनालयाचा प्र. श्री. नेरुरकर पुरस्कार, वेंगुर्ला रत्न पुरस्कार आणि सारद मजकूर संस्थेचा 'मुळातून माणूस' पुरस्कार मिळाला आहे. १९६८ पासून बेळगावहून पंढरपूरला जाणाऱ्या वै. मामा दांडेकर दिंडीचे नेतृत्व ते २००५ पासून करत आहेत. विविध माध्यमांमध्ये सातत्याने संत साहित्यावर ते लेखन करत असतात. या पुरस्काराबद्दल साहित्य आणि पुरोगामी चळवळीतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा