सिंधुदुर्ग today
नांदगाव स्थानकावर विसरलेली पाच हजारांची बॅग काही तासांत मालकिणीच्या स्वाधीन!
वाघेरीचे माजी सरपंच तुकाराम गुरव यांच्या सतर्कतेमुळे बॅग सुखरूप परत.
नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्या उपस्थितीत बॅग महिलेच्या ताब्यात.
कणकवली / सिंधुदुर्ग : (ऋषिकेश मोरजकर)
प्रवासात स्थानकाचा अंदाज न आल्यामुळे आणि धावपळीत नांदगाव स्टेशन दरम्यान राहिलेली ५ हजार रुपयांच्या रोख रकमेची बॅग, वाघेरी चे कर्तव्यदक्ष माजी सरपंच , विद्यमान सोसायटी व्हा. चेअरमन तसेच तुकाराम गुरव यांच्या सतर्कतेमुळे अखेर सुखरूपपणे संबंधित महिलेच्या हाती लागली आहे. या घटनेमुळे डगमगलेल्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद पाहायला मिळाला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव मोरयेवाडी येथील सौ. संतोषी संतोष मोरये या महिला प्रवाशाचा रेल्वे प्रवास सुरू होता. ट्रेनचा स्टॉप आल्यामुळे एक महिला प्रवासी आणि तिचा छोटा मुलगा नांदगाव स्टेशनवर उतरण्याच्या तयारीत असतानाच मुलगा खाली उतरला व बॅग खाली उतरून ठेवली त्यात ट्रेन पुन्हा सुरू होताच खाली उतरलेल्या त्या मुलाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले परंतु ५ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग मात्र नांदगाव स्टेशनच्या परिसरातच मागे राहिली.
त्या दरम्यान, तिथेच वाघेरी चे माजी सरपंच तुकाराम गुरव याच ट्रेन मधून उतरले होते. यांना लक्षात ही बाब आली. मात्र, संबंधित महिला नेमकी कोणत्या गावाची आणि कोणाची आहे, याची कोणतीही माहिती त्या व्यक्तीला नव्हती.
नांदगाव पोलीस पाटलांची सतर्कता आणि कौशल्याची जुळवाजुळव:
ही महिला नांदगाव, तोंडवली किंवा बावशी या परिसरातीलच असावी, असा अंदाज बांधत त्या व्यक्तीने आपल्या ओळखीच्या आणि संपर्कात असलेल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. याच दरम्यान एका नागरिकाने नांदगावच्या पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्याशी संपर्क साधला आणि “ट्रेनमधून उतरत असताना मोरये नामक महिलेची बॅग राहिली आहे का?” अशी चौकशी केली.
माहिती मिळताच पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत “होय, नांदगाव मोरये वाडी येथील संतोषी संतोष मोरये या महिलेची बॅग राहीली आहे. तीने माझ्याकडे संपर्क केला होता.
सुखद शेवट आणि सुरक्षित सुपूर्द:
याची खात्री पटल्यानंतर, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी संतोषी संतोष मोरये या महिलेला सोबत घेतले आणि वाघेरी गाठले. तेथे त्या महिलेची बॅग तपासली असता, त्यामध्ये ५ हजार रुपयांची रोख रक्कम व इतर सर्व वस्तू पूर्णपणे सुरक्षित व जशाच्या तशा आढळल्या.
आपली गमावलेली रोख रक्कम आणि महत्त्वाच्या वस्तू अवघ्या काही वेळात सुखरूप मिळाल्यामुळे संतोषी मोरये यांनी वाघेरी चे माजी सरपंच तथा व्हा. चेअरमन तुकाराम गुरव
नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर आणि मदत करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रवासादरम्यान स्थानक न ओळखता आल्याने निर्माण झालेला हा संभ्रम अखेर एका सुसंवादी आणि सतर्क भूमिकेमुळे सुखरूपपणे संपुष्टात आला.
यावेळी माजी सरपंच व व्हा. चेअरमन तुकाराम गुरव, लिंगेश्वर - वाघेरी पोलीस पाटील अजिंक्य गुरव , नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर, उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा