सिंधुदुर्ग today
मातृसेवा फाउंडेशनतर्फे झाराप केंद्रशाळेत स्वसंरक्षण अभियान
मातृसेवा फाउंडेशनच्या संध्या सामंत सावंत यांची माहिती.
कुडाळ प्रतिनिधी -
शिक्षणातून सक्षमीकरण आणि जागरूकतेतून सुरक्षितता या विचारातून कार्यरत असलेल्या मातृसेवा फाउंडेशनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप केंद्रशाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण अभियान आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. मातृसेवा फाउंडेशन आणि कुडाळ पोलीस विभागाच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला मातृसेवा फाउंडेशनचे मान्यवर विश्वस्त सुहास सामंत, संध्या सामंत आणि मिलिंद नाईक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वयोगटानुसार सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. आजच्या काळात मुलांना केवळ शैक्षणिक ज्ञान देणे पुरेसे नसून स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कुडाळ पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस मित्र या भूमिकेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चांगला वाईट स्पर्श ओळखणे, अनोळखी व्यक्तींपासून सावध राहणे, कोणत्या प्रसंगी मदत मागावी, ११२ आणि चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकाचा वापर कसा करावा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर अशा विविध विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. प्रसंगावधान, संभाव्य धोक्यांच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि स्वसंरक्षणाचे महत्त्व याबाबत प्रात्यक्षिकांसह धडे देण्यात आले. पोलिसांच्या या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी होऊन सुरक्षिततेविषयी आत्मविश्वास वाढला.याचबरोबर शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्वसंरक्षण आणि शैक्षणिक मदत यांची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.मातृसेवा फाउंडेशन महिला, बालक आणि समाजातील वंचित घटकांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल फाउंडेशनने कुडाळ पोलीस विभागाचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा