सिंधुदुर्ग today
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आयोजित कवी नारायण सुर्वे दीर्घ काव्य स्पर्धेत कवी अविनाश गायकवाड यांची कविता सर्वोत्कृष्ट
विजेत्या कवितेला दहा हजार रुपयांचे पारितोषिक
संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर,कार्यवाह सुरेश बिले यांची माहिती
कणकवली/ प्रतिनिधी
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दीर्घ काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी एकूण २१९ कवींनी आपल्या दीर्घ कविता पाठवल्या होत्या.त्यातून ठाणे येथील कवी अविनाश गायकवाड यांची 'उडत्या पाखरांची पिसं' ही कविता सर्वोत्कृष्ट ठरली असून दहा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचे पारितोषिक या कवितेने पटकावले आहे.तर अन्य 10 कवींच्या कवितांना लक्षवेधी कवितांचे पारितोषक म्हणून सन्मान पत्र देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर,प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे आणि मराठीतील ज्येष्ठ कवी व समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी काम पाहिले. परीक्षकांच्या अभिप्रायात म्हटले आहे की, 'उडत्या पाखरांची पिसं' ही ४५ पृष्ठांची कवी अविनाश गायकवाड यांची दीर्घकविता आहे. समकालीन वास्तवाचे अनेक पदर या कवितेतून उलगडत जातात. आजच्या काळाचा भेसूर चेहरा या कवितेचं मुख्य केंद्र आहे. त्याबद्दलचे असंख्य प्रश्न ही कविता उपस्थित करते. शोषणग्रस्त माणूस आणि समताधिष्ठित समाजरचनेविषयीची ओढ ही या कवितेची प्रमुख आस्थाकेंद्रं आहेत. नेमका तोच या कवितेला कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेशी जोडणारा प्रमुख धागा आहे. सूचकता आणि उपहास या कवितेचे दोन महत्त्वाचे विशेष आहेत. उपरोधगर्भ संयत शैली आणि अनोख्या रुपकांचा वापर ही या कवितेची मोठी ताकद आहे. दुष्काळ, उपासमार, जातीय अत्याचार, न्यायव्यवस्थेची असहाय्यता, दहशतीचं विकृत राजकारण - खैरलांजी, रमाबाई, उना ते ओखला पर्यंतच्या घटनांशी संबधित आशयसूत्रांची गुंफण या कवितेत अनुभवास येते. त्यातून समकालीन वास्तवाचा दाहक पट उलगडत जातो. अस्वस्थता हे चांगल्या कवितेचं लक्षण मानलं, तर वाचकाला अस्वस्थ करण्याची क्षमता या कवितेत आहे आणि म्हणूनच या स्पर्धेतली ती महत्त्वाची कविता आहे.
या स्पर्धेतील परीक्षकांनी सुचविलेल्या दहा कवितांना 'नारायण सुर्वे स्मृती लक्षवेधी कविता पुरस्कार' म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये हर्षदा सुंठणकर (बेळगाव),स्वप्निल सुनील चव्हाण (पुणे), खाजाभाई बशीर बागवान (सोलापूर) नरेंद्र सोनारकर (चंद्रपूर),राजेंद्र मुंढे (वर्धा), अश्विनी दीक्षित (बारामती), बादल मुरारी (राजगुरूनगर) दिशा खातू (मुंबई),विद्या देशमुख (अमरावती) गणेश भाकरे (नागपूर) आदींचा समावेश आहे.सदर स्पर्धेचे पारितोषक वितरण मालवण येथे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 6 व्या समाज साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा