सिंधुदुर्ग today



एआय माहिती देईल पण जगण्याला दिशा देऊ शकत नाही - अजय कांडर.

आचरा ज्युनिअर कॉलेज पारितोषिक सोहळा आणि ग्रंथालय उद्घघाटन समारंभ.

आचरा/ प्रतिनिधी

      "संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि संस्कारांचा सर्वांगीण विकास होय," आजच्या एआयच्या जमान्यात संवादाला फार महत्त्व असून एआय माहिती देईल जगण्याची दिशा देऊ शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांनी केले.  

     धी आचरा पीपल्स असोसिएशन, मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथे आयोजित आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी सत्कार समारंभ, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण सोहळा आणि ग्रंथालय उदघाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. मुंबई कमिटीचे अध्यक्ष प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कवी कांडर यांनी बोलताना एआयच्या काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील पण माणसाची संवेदना गोठून जाईल हा संभाव्य धोकाही आपल्या भाषणात लक्षात आणून दिला.

     यावेळी विविध शाखांतील आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथून रुद्र संजय जाधव व सई अंकुशराव घुटुकडे, नामदेव शंकर कावळे इंग्लिश मीडियम येथून तेजस विश्वास पेडणेकर व रंजिता राजेंद्रप्रसाद नाडकर्णी, कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथून प्रथमेश राजेंद्र पुजारे व कस्तुरी नितीन परुळेकर, तर बी.एम.एस. व कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालय येथून भूषण निलेश नाईक व दर्शना सुनील परब यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच न्यू इंग्लिश स्कूलच्या उपमुख्याध्यापिका मधुरा महेश माणगावकर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशालेचे माजी विद्यार्थी तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. सन २०२५–२६ मधील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुशराव घुटुकडे यांनी केले. मुंबई कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांनी संस्थेची दैदीप्यमान परंपरा व भावी ध्येयधोरणे मांडली. शालेय समितीचे अध्यक्ष जे. एम. फर्नांडिस यांनी प्रमुख अतिथी अजय कांडर यांचा परिचय करून दिला.  

     यावेळी इकबाल काझी (उपकार्याध्यक्ष, मुंबई कमिटी), ॲड. सुभाष आचरेकर (सचिव), मंगेश आचरेकर (कोषाध्यक्ष), निलेश सरजोशी (अध्यक्ष, इंग्लिश मीडियम शालेय समिती), संजय मिराशी (अध्यक्ष, बी.एम.एस. व कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालय), रघुनाथ पाटील (अध्यक्ष, तंत्र व कौशल्य विकास), बाबाजी भिसळे, अजित आचरेकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, प्राचार्य नितेश सारंग, सुरेश ठाकूर, अशोक कांबळी यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा कदम यांनी केले, तर आभारप्रदर्शन इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका मायलीन फर्नांडिस यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today