सिंधुदुर्ग today
नांदगाव कालव्याच्या पाईप लाईन साठी खोदकाम झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.
उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे बांधकाम उपविभाग यांच्या येथे राजा म्हसकर यांची मागणी
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे लघू पाटबंधारे या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील काम सुरू करण्यात आले होते. या अनुषंगाने पाईप लाईन पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनीतून खोदाई करण्यात आली होती. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तरी संबंधित शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत उर्फ राजा म्हसकर यांनी कणकवली येथील उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे बांधकाम उपविभाग यांच्या येथे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान हा विषय म्हसकर यांनी कणकवली पंचायत समिती येथे झालेल्या जनता दरबारात उपस्थित केला होता.
नलिका वितरण प्रणालीचे काम माहे मार्च २०२६ या कालावधीत मौजे नांदगाव या गावामध्ये करण्यात आले. मात्र भूमीगत नलिका खोदाई करून पाईप लाईन करण्याअगोदर संबंधित नलिका टाकण्यासाठी ज्या शेतक-यांच्या जमिनीची खोदाई होणार होती, अशा शेतक-यांच्या जमिनीचे भूसंपादन करून त्यांना योग्य मोबदला देण्यात आल्यानंतरच खोदाई करण्यात येणे आवश्यक होते. मौजे- ओटव, ता. कणकवली या गावातील शेतक-यांचे याच प्रकारचे काम करण्याअगोदर संबंधीत शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देऊन, त्यानंतर प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे.
मात्र नांदगाव गावातील शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा अद्याप मोबदला दिलेला नाहीच, शिवाय त्यांचे जे नुकसान झाले त्याबाबत कोणीही दखल घेतलेली नसल्याचे राजा म्हसकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
खोदाई करण्यापूर्वी संबंधीत ठेकेदाराने ज्या शेतक-यांची जमीन या कालव्याखाली येते त्या जमिनीची मोजणी केली आहे, असे शेतक-यांचे म्हणणे आहे. परंतु मोबदला न देताच खोदाई करून काम सुरु केले. पावसाळ्यात शेतीची कामे करताना खोदलेल्या चरामध्ये गुरे रुतून बसणे, भात-शेतीची लावणी करण्यातही अडथळा निर्माण झाला. तर काही शेतक-यांनी शेतीच केली नाही. कारण नांगरणीच्या
वेळी नेमकी खोदाई कुठे आहे हे लक्षात येणे कठीण होते. कारण सुमारे पाच फुट खोल चर असल्याने रुतून बसण्याची भीती होती. त्यामुळे लहान शेतक-यांना शेतीविना राहण्याची वेळ आली आहे. शिवाय ज्यांची झाडे तोडण्यात आली, त्याचा मोबदला शेतक-यांना देण्यात आला, मात्र तो कोणत्या झाडाला काय दर देण्यात आला, हे सांगितले नाही. असे शेतक-यांचे म्हणणे असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा