सिंधुदुर्ग today



आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर - डॉ. राजन गवस.

ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद.

रसिकांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली, प्रतिनिधी

     काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच. आज सर्वत्र माणसाच्या मनात अस्थिरता आणि अस्वस्थता पसरली आहे. या अस्वस्थतेला उत्तर म्हणजे `तुकाराम' आहे. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित आणि प्रभा प्रकाशन प्रकाशित `आजच्या काळासाठी तुकाराम हा ग्रंथ यासंदर्भात मौलिक मार्गदर्शक आहे. सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये या ग्रंथाची लघु आवृत्ती वितरित व्हायला हवी. नव्या पिढीला तुकाराम कळणे म्हणजेच त्यांचे जगणे विवेकशील बनविणे होय. परुळेकर यांच्या वर्तन आणि लेखनात कोणताही फरक नाही. म्हणूनच हा महत्त्वाचा ग्रंथ ते लिहू शकले, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार आणि विचारवंत डॉ. राजन गवस यांनी केले.

        कणकवलीच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ॲड. देवदत्त परुळेकर लिखित `आजच्या काळासाठी तुकाराम' या ग्रंथावरील परिसंवाद मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण सभागृहात डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, समीक्षक प्रा. डॉ. गोविंद काजरेकर आणि समीक्षक प्रा. संजीवनी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी ग्रंथलेखक ॲड. देवदत्त परुळेकर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    डॉ. राजन गवस म्हणाले, "संत तुकारामांसह संपूर्ण वारकरी संप्रदायाची भीती समाजातील विविध घटकांना कायमच वाटत आली आहे. याचे कारण म्हणजे तुकाराम कधीच कालबाह्य ठरत नाहीत. आजच्या एकूणच परिस्थितीला तुकाराम हेच उत्तर आहेत. 'आजच्या काळासाठी तुकाराम ` या ग्रंथातून लेखक परुळेकर यांनी हेच दाखवून दिले आहे. वारीत धारकरी घुसवले जात आहेत. आजच्या राजकारण्यांना सर्वात जास्त भीती संतांचीच आहे. म्हणूनच बाजारु कीर्तनकार उभे केले जात आहेत. हेच सर्व परुळेकर या पुस्तकातून सांगतात. याच काळात हे पुस्तक लिहावेसे का वाटले, याचे उत्तर या ग्रंथातील लेखनातून मिळते. सतत निरोगी राहायचे असेल तर आपल्याला तुकारामांकडे जावेच लागेल. तुकारामांनी मानवजातीची नाडी ओळखली आहे. समाज घडविण्यासाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्यांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे."डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, "आजच्या काळासाठी तुकाराम या ग्रंथाचे लेखन काव्यमय आहे. परुळेकर जागतिक पातळीवरील उदाहरणे देऊन तुकाराम आपल्याला अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगतात. सकस दृष्टीची तरुण पिढी निर्माण होण्यास हा ग्रंथ मदत करेल. आजची तरुणाई निरर्थक कामांमध्ये गुंतली आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. या ग्रंथाच्या लेखनातून जीवनाचे दर्शन घडते. काय घ्यायचे हे वाचकांच्या हाती आहे. व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याची भूमिका या लेखनात आहे.डॉ. गोविंद काजरेकर म्हणाले, "मराठी ज्ञानपरंपरेत तुकाराम अग्रस्थानी आहेत आणि त्या सर्वांचे दर्शन या ग्रंथातून होते. तुकोबांच्या वचनातून आजचे जागतिकीकरण आणि अस्वस्थता तपासून घेता येते. परुळेकर यांनी आजचा काळ या ग्रंथात उभा केला आहे. हा ग्रंथ समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणे ही आजची गरज आहे."प्रा. संजीवनी पाटील म्हणाल्या, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. कृतीशीलतेची जोड देऊन आपल्यातील विवेक जागृत ठेवण्याचे काम हा ग्रंथ करतो."

     ॲड. देवदत्त परुळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अजय कांडर यांनी प्रास्ताविक केले, तर मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रमिता तांबे, हरिश्चंद्र भिसे, मेघना सावंत, सत्यवान साटम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मधुकर मातोंडकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कवी भालचंद्र सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. दर्शना पाताडे यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कविसंमेलनात वीरधवल परब, वामन पंडित, अरुण नाईक, विठ्ठल कदम, श्वेतल परब, मधुकर मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, संतोष तुळणसकर, मेघना सावंत, रामचंद्र शिरोडकर, हरिश्चंद्र भिसे, आर्या बागवे, निशिगंधा गावकर, संगीता पाटील, संचिता चव्हाण, सुगंधा देवरुखकर, नंदिनी पवार, योगिता शेटकर, श्री. बोवलेकर, सत्यवान साटम, सायली नारकर, दर्शना पाताडे, रिमा भोसले, निलेश जाधव आदींनी कविता वाचन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today