सिंधुदुर्ग today
'ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकोबा' ग्रंथावर मालवणात ५ रोजी परिसंवाद
डॉ. राजन गवस, डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.गोविंद काजरेकर,प्रा.संजीवनी पाटील आदी अभ्यासकांचा सहभाग.
समाज साहित्य प्रतिष्ठान - बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे कार्यक्रमाचे आयोजन.
कणकवली / प्रतिनिधी
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर लिखित व प्रभा प्रकाशन, कणकवली प्रकाशित 'आजच्या काळासाठी तुकोबा' या ग्रंथावर रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात शिवाजी विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख आणि संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, समीक्षक-कवी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर आणि समीक्षक तथा ‘प्रभा साहित्य मैफल’ या साहित्यिक नियतकालिकाच्या संपादक प्रा. संजीवनी पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
ह.भ.प. ॲड. देवदत्त परुळेकर हे संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठीतील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये संत साहित्याचे विवेचन करणारे सात हजारांहून अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध व बहुचर्चित आहेत. 'आजच्या काळासाठी तुकोबा' हा ग्रंथ त्यांच्या लेखन वाटचालीतील अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. त्यामुळेच समाज साहित्य प्रतिष्ठान आणि बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे या ग्रंथावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथाला संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सतीश बडवे यांची पाठराखण लाभली आहे. ते म्हणतात, “समकाळातील सामाजिक घटनांच्या पार्श्वभूमीवर तुकोबांच्या रचनांचा घेतलेला वेध ह.भ.प. देवदत्त परुळेकर यांच्या या लेखनात उमटलेला आहे. जागतिक पातळीवरील आणि आपल्या भोवतालच्या व्यक्तींच्या विचार करण्याच्या पद्धतीची उदाहरणे देत तुकोबांच्या अभंगचरणांशी त्याची सांगड घालत मांडलेल्या चिंतनाचा नाद या संपूर्ण लेखनातून निनादत राहतो. तुकोबांची अवतरणक्षमता व त्यांच्या रचनेतील सुभाषितांची अभिव्यक्ती यांचा वर्तमान जीवनाशी अनुबंध जोडण्याची लेखनपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्री. परुळेकर विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असल्यामुळे माणसे व समाज यांना आपल्या अनुभवातून जाणून घेण्याचे त्यांचे कसबही या लेखनात प्रकटलेले दिसते. संतविचारातून दिसणारी जनकल्याणकारी दृष्टी यांचा मनोज्ञ संगम हे या लेखनाचे बलस्थान आहे.परिसंवादानंतर दुसऱ्या सत्रात कवी भालचंद्र सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात श्वेतल परब, योगिता राजकर, मनीषा पाटील, प्रमिता तांबे, मधुकर मातोंडकर, विजय सावंत, मनीषा शिरटावले, नीलम यादव, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, संतोष तुळणसकर, मेघना सावंत, रामचंद्र शिरोडकर, हरिश्चंद्र भिसे, आर्या बागवे, निशिगंधा गावकर, संचिता चव्हाण, सुगंधा देवरुखकर, नंदिनी पवार, सायली नारकर, योगिता शेटकर, सत्यवान साटम, दर्शना पाताडे, रिमा भोसले, अर्चना गव्हाणकर, प्रगती पाताडे, निलेश जाधव, मालिनी लाड आदी कवींना काव्यवाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली. अधिक माहितीसाठी संपर्क : ९४०४३९५१५५

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा