सिंधुदुर्ग today
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सावंतवाडी मतदार संघाचा आढावा
दोडामार्ग आणि सावंतवाडी तहसील कार्यालयात घेतली आढावा बैठक
कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर करणार कठोर कारवाई
सिंधुदुर्गनगरी, दि. ६ (ऋषिकेश मोरजकर) :
लोकशाही व्यवस्थेचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम–२०२६ अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सावंतवाडी व दोडामार्ग तहसील कार्यालयांना भेट देत त्यांनी अभियानाच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती घेतली तसेच मतदार यादीतील प्रत्येक नोंद अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त राहील, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना दिल्या. या कामात निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि पर्यवेक्षक यांच्याशी सविस्तर संवाद साधला. परिगणना फॉर्मचे वेळेत वितरण, नागरिकांकडून भरलेले फॉर्म नियोजित कालावधीत परत घेणे, आवश्यक कागदपत्रांची बारकाईने पडताळणी आणि त्याचे संगणकीकरण ही संपूर्ण प्रक्रिया विहित मुदतीत व शंभर टक्के अचूकतेने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्याने प्रत्येक नोंद विश्वासार्ह आणि अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधावा, नागरिकांच्या माहितीची पडताळणी करावी आणि कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
विशेष सखोल पुनरीक्षण अभियानासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत जिल्हाभरातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरोघरी जाऊन परिगणना फॉर्मचे वितरण, माहितीची प्रत्यक्ष पडताळणी आणि आवश्यक दुरुस्त्यांची नोंद करत आहेत. नव्या मतदारांची नोंदणी, पत्त्यातील बदल, नावातील त्रुटी दूर करणे तसेच इतर आवश्यक सुधारणा या प्रक्रियेद्वारे करण्यात येत असून, मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील तपासून आवश्यक माहिती व कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना वेळेत उपलब्ध करून द्यावीत. अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक जागरूक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक मतदाराने या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या दौऱ्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसीलदार ओमकार ओतारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा