सिंधुदुर्ग today



कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२  हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार.

हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान;

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. 

सिंधुदुर्ग today : (ऋषिकेश मोरजकर) चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी  मदतीचे विशेष पॅकेज जाहीर केले.यात विमा काढलेला शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये अशा पद्धतीने ही मदत दिली जाणार आहे. असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान या नुकसान भरपाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी केलेले प्रयत्न, शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून  सातत्यपूर्ण केलेले प्रयत्न या सर्वांनाच यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.ते म्हणाले,१७ मार्च २०२६ रोजी कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सूचनांच्या आधारे शासनाने कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून प्राथमिक अहवाल मागवला असून त्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ३०२ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. यामध्ये ३५,५८० हेक्टर क्षेत्रावरील ८०,४१८ शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा घेतला आहे. कमी व जास्त तापमानामुळे सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे.

आंबा पिकासाठी कमी तापमानामुळे प्रति हेक्टर ६,०७१ ते ३४,००० रुपये, तर जास्त तापमानामुळे १७,१७१ ते ६८,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस, गारपीट व वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी १५ मेपर्यंत विमा संरक्षण लागू आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर २ लाख २७ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.

दरम्यान, काजू पिकाखाली कोकणात १,७५,१४० हेक्टर क्षेत्र असून १९८ महसूल मंडळांपैकी सुमारे १५० मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय ठरली आहे. काजूसाठी प्रति हेक्टर १६,८०० ते ४२,००० रुपये नुकसानभरपाई निश्चित असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ६० हजार रुपये आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला नाही, त्यांनाही शासन वाऱ्यावर न सोडता मदत देणार आहे. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नुकसानीचा अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार असून, मागील वेळेपेक्षा वाढ करून यंदा सुमारे २२ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today