सिंधुदुर्ग today



नाटककार - कवी सिध्दार्थ विष्णू तांबे लेखन आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर.

लेखन पुरस्कारासाठी कवयित्री संध्या तांबे  तर कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनिल जाधव यांची निवड.

पुरस्कार संयोजक विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर यांची माहिती.

सावंतवाडी/प्रतिनिधी

       नाटककार कवी कार्यकर्ते आणि निष्ठावंत प्राध्यापक अशी ओळख असलेल्या प्रा.सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे अकाली निधन झाले.आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या साहित्यिक मित्रमंडळीतर्फे एप्रिल मध्ये तांबे यांच्या गाजलेल्या आंबेडकर चौक या कवितेच्या शीर्षकाने आंबेडकर चौकातील साहित्य संमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येत आहे.यानिमित्ताने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे (ओरोस) यांना तर सिद्धार्थ विष्णू तांबे कार्यकर्ता पुरस्कार ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्ते अनिल जाधव (वेंगुर्ले) यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख रक्कम,स्मृती चिन्ह,शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक कवी विठ्ठल कदम आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी दिली.

        प्रा.सिद्धार्थ विष्णू तांबे हे कणकवली शिरवलचे. त्यांचे सर्व शिक्षण सिंधुदुर्गात झाले. मात्र नोकरीच्या निमित्ताने ते वसई येथे वर्तक महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांचे 'जाता नाही जात ' हे नाटक बहुचर्चित झाले.त्यामुळे त्यांची मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे नाटककार अशी ओळख निर्माण झाली. त्याचबरोबर त्यांचा काव्यसंग्रही प्रकाशित झाला होता. परिवर्तन चळवळीतील एक निष्ठावंत लेखक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख वाढत जात असतानाच त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ यावर्षीपासून त्यांच्या मित्रमंडळींतर्फे पुरस्कार योजना आखण्यात आली असून या पहिल्या पुरस्कारांसाठी कवयित्री संध्या तांबे आणि अनिल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.कवयित्री संध्या तांबे या कोकणातील ज्येष्ठ कवयित्री असून सुमारे 50 वर्ष निष्ठेने काव्य लेखन करत आहेत. त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांच्या कवितांचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध भागातील निमंत्रितांच्या कवी संमेलनासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले असून मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंक आणि नियतकालिकांमध्ये त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात. गेल्या वर्षीच त्यांना साहित्य मैत्र पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर अनिल जाधव हे गेली दहा वर्षे वेंगुर्ले येथे पदरमोड करून साहित्य चळवळ निष्ठेने राबवत असून त्यांच्या चळवळीतर्फे महाराष्ट्रातील अनेक नव्या कवींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तळकोकणातील परिवर्तन सांस्कृतिक चळवळ पुढे जाण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान लाभले असून सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेचीही ते यशस्वीपणे धुरा सांभाळत आहेत. त्याचबरोबर परिवर्तन विचाराने लिहिणाऱ्या लेखक कवींना मंच उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या संपादनाखाली गेली अनेक वर्ष प्रसंवाद हे नियतकालिक प्रकाशित होत आहे.दोन्ही पुरस्कार विजेत्यांच्या अशा योगदानामुळेच त्यांची सिद्धार्थ विष्णू तांबे लेखन आणि कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहितीही श्री कदम आणि श्री मातोंडकर यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today