सिंधुदुर्ग today



असलदेत बिबट मादीच्या वावराने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण

कणकवली वनक्षेत्रपालांकडे सापळा लावण्याची मागणी : शेतकरी व नागरिकांवर जीवघेणा हल्ला होण्याची वाट पाहू नका.

असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांची मागणी.

कणकवली दि.१५ जानेवारी  :

असलदे गावात सरस्वती हायस्कुल नांदगाव या स्कुलच्या पाठीमागील भागात एक बिबट मादी व दोन पिल्ले असे तीन बिबट वावरत आहेत. या ठिकाणी शाळेतील मुले त्या परिसरात असतात. तसेच असलदे धनगरवाडी नदीकिनारी असलेला भाग व गावठण दिवानसानेवाडी भागात या बिबट्यांचा वावर सुरु आहे. या बिबट मादीसह त्यांच्या पिल्लांना सापळा लावून पकडावे , अशी मागणी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्याकडे सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केली आहे. 

दरम्यान, देवगड निपाणी महामार्गालगत शेतकरी गोविंद महादेव पारकर यांच्या गायीच्या वासराला बिबट मादीने ठार मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. तसेच असलदे गावठणवाडी  येथील दोन वासरांना बिबट्याने गेल्या 2 महिन्यांत ठार केले आहे. त्याठिकाणी बिबट मादीचा वावर देखील होत असल्याने शेतक-यांच्या निदर्शनास होत आहे. असलदे उगवतीवाडी , मधलीवाडी , डामरेवाडी या भागातील काजू बागायतदार शेतक-यांना या बिबट मादीचा वावर असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. असलदे धनगरवाडी येथील रुपेश खरात , विजय खरात यांची दोन वासरे महिन्याभरापूर्वी या बिबट मादींनी हल्ला करुन ठार केले आहे. काही कुत्र्यांवर या बिबटने हल्ला केला आहे. तसेच असलदे ओझर येथील जंगलात आर्सिया काझी यांच्या शेळ्यांच्या कळपावर चार दिवसांपूर्वी या बिबट मादीने हल्ला केला आहे. या संदर्भात सातत्याने वनविभाग यांच्याकडे संबंधित घटनांबाबत कळूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे असलदे गावातील बिबट मादीच्या या त्रासामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत. शेतकरी व नागरिकांवर जीवघेणा हल्ला होण्यापूर्वी कणकवली वनविभाग कार्यालयाकडून तातडीने सापळा लावत बंदोबस्त करावा , अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा असलदे गावातील शेतक-यांच्यावतीने  सोसायटी चेअरमन भगवान लोके , माजी सरपंच पंढरी वायंगणकर, सरपंच चंद्रकांत डामरे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today