सिंधुदुर्ग today
प्राचार्य शरद काळे स्मृती 'शारदीय प्रतिष्ठान पुरस्कार' डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी यांना जाहीर
कणकवली/प्रतिनिधी
शिक्षण,साहित्य व संस्कृती या त्रिसूत्रीसाठी कार्य करण्या-या खारेपाटण येथील 'शारदीय प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे स्व.प्राचार्य शरद काळे स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 'शारदीय प्रतिष्ठान' पुरस्कार तळेरे डॉ.मिलिंद कुलकर्णी आणि डॉ.सौ.ऋचा कुलकर्णी या दाम्पत्याला देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली.
कोकणचे ज्येष्ठ कथाकार प्राचार्य शरद काळे व त्यांच्या पत्नी वर्षा काळे यांचे खारेपाटण शिक्षणसंस्थेचे व्रतस्थ दाम्पत्यकार्य सर्वांना सुपरिचित आहे. याच कार्याचा प्रेरक स्मृतिजागर म्हणून त्यांची मुले कवयित्री डाॅ.अनुजा जोशी, सौ.चारूता प्रभुदेसाई,कपिल काळे व कुटुंबियांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे दरवर्षी एका सेवाभावी कलाप्रिय दाम्पत्याला हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा डाॅ.कुलकर्णी दाम्पत्याची यासाठी निवड होऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येत आहे रू.१०,००० मानपत्र व शारदीय स्मृतीभेट असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कारप्रदान कार्यक्रम 'वृंदावन मंगल कार्यालय सभागृह धारखंड,वाळपई गोवा येथे 'शारदीय स्मृती सोहळ्या'त आयोजित करण्यात आला आहे. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांच्या हस्ते शनिवार २४ मे २०२५ रोजी सायं ४ वा.होणा-या कार्यक्रमात त्यांना तो प्रदान करण्यात येईल. यावेळी 'ही एक प्रेरक सत्यकथा' नावाचा स्व.काळे यांचे जीवनचरित्र, लेखन व कार्यदर्शन घडविणारा विशेष कार्यक्रमही सादर होईल.मालवण येथील प्रसिद्ध लेखिका वैशाली पंडित व काळे कुटुंबीय हा कार्यक्रम सादर करतील.
डाॅ.कुलकर्णी दाम्पत्याचे कोकणच्या वैद्यकीय,साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. तळेरे सारख्या ग्रामीण भागात प्रसूती व मेडिसीन आंतररुग्ण विभागासह सुसज्ज रुग्णालय गेली ३० वर्षे ते चालवतात.गोरगरीब ग्रामीण जनतेसाठी व त्यांच्या अफाट लोकप्रिय लेखनातूनही ते एक सहृदय 'कोकणचो डॉक्टर' म्हणून सुपरिचित आहेत.स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध व मनोरुग्णालयांच्या सुधारणा कामात त्यांचे विशेष कार्य आहे.डाॅ. ऋचा यांचे स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रबोधनपर व्याख्याने,शिबिरे, 'वयात येताना' या फिल्मची सहनिर्मिती असे विविधांगी कार्य त्यांचे आहे.'संवाद परिवार, तळेरे' या संस्थेच्या माध्यमातून हे दाम्पत्य सातत्याने साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असते.
तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा