सिंधुदुर्ग today



जि.प.शाळा ओटव नं.१ येथे मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न 

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले  : राजेश कदम 

----------------------------------------

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

प्रतिनिधी: मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार वि.वा.शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा  २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस संपूर्ण राज्यभरात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  या दिनाचे औचित्य साधून जि.प.शाळा ओटव नं.१ येथेही हा दिवस उत्साहात संपन्न झाला. 

प्रशालेचे मुख्याध्यापक राजेश कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांना कुसुमाग्रज यांच्या सामाजिक आशयाबरोबरच बालसुलभ मनांना हाक देणाऱ्या बालकवितांची ओळख करुन दिली. एका कवीचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो यातच कुसुमाग्रज यांचे अलौकिक साहित्यिक योगदान सामावले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले आणि आपल्या साहित्यातून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला मोठ्या उंचीवर पोहोचवले असे प्रतिपादन राजेश कदम यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना केले. 

यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी काही निवडक मराठी बालकवितांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाची सुरुवात लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी या गीतानी झाली. त्यानंतर कुसुमाग्रज यांच्या उठा उठा चिऊताई, गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, तसेच इतरही मराठी कवींच्या प्रसिद्ध कवितांचे वाचन केले. यामध्ये स्वरा जाधव, समृद्धी तांबे, राज तांबे,आरोही पेडणेकर, गंधर्व गांवकर, युवराज गांवकर, सान्वी तांबे, रुद्र गांवकर, कार्तिकी गांवकर, धनंजय तांबे, समर्थ खांबळकर, रोहन तांबे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

प्रशालेच्या सहशिक्षिका स्नेहा सामंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मराठी दिनाचे महत्त्व विशद केले. तर सहशिक्षक दिनेश जाधव यांनी कार्यक्रमाचा समारोप केला आणि सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today