सिंधुदुर्ग today
अजय पाताडे यांच्या हस्ते डॉ.राजेंद्र मुंबरकर यांना सिंधुदुर्ग भूषण पुरस्काराने गौरविले.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार.
कणकवली/ प्रतिनिधी
येथील कणकवली महाविद्यालयातील ग्रामीण विकास विभागाचे माजी विभागप्रमुख, गोपूरी आश्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना पिंपरी-चिंचवड येथील सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्कार पिंपरी चिंचवड येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सिंधुदुर्ग उत्कर्ष मंडळाचे प्रमुख अजय पाताडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ, पिंपरी-चिंचवड ही गेल्या ४८ वर्षांपासून कार्यरत असलेली नामांकित संस्था आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव विविध क्षेत्रात उंचावणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी पुरस्कार देऊन या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात येतो. यंदाचा ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्काराचे मानकरी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर ठरले आहेत.
११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड येथे आयोजित भव्य समारंभात प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि वाङ्मयीन चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे ते जिल्हाध्यक्ष असून फुले-शाहू-आंबेडकर दर्पण प्रबोधिनीचे, आनंद विकास मंडळ मिठमुंबरी, तालुका देवगड व श्रीवरस्तल प्रतिष्ठान, देवरुख- रत्नागिरीचे ज्येष्ठ सल्लागार म्हणूनही ते सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. कणकवली महाविद्यालयातून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या सामाजिक चळवळीतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा