सिंधुदुर्ग today
संध्या सामंत सावंत यांचा लोकमत सखी जनसेवा पुरस्काराने गौरव.
सामाजिक कार्याच्या योगदानाची दखल.
कणकवली / प्रतिनिधी
मूळच्या झाराप येथील आणि सध्या ठाण्यात कार्यरत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा लेखिका संध्या सामंत-सावंत यांना 'लोकमत सखी जनसेविका सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्या गेली १५ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून २०१८ मध्ये त्यांनी मातृसेवा फाउंडेशनची स्थापना केली. महिला, बालविकास, शिक्षण, स्वावलंबन आणि सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. ठाणे ते सिंधुदुर्गातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवणे, तसेच महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम त्या करतात. त्यांच्या प्रयत्नातून ठाणे पाचवड आदिवासी भागातील ३०हून अधिक आदिवासी महिला साक्षर झाल्या असून घरकाम करणाऱ्या महिला, पोलीस महिला आणि रेड लाईट एरियामधील महिलांसाठीही त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आतापर्यंत ५०० हून अधिक शिक्षणापासून वंचित मुलांना त्यांनी शिक्षण प्रवाहात आणले आहे.लोकमत समूहाच्या 'सखी मंच'द्वारे समाजसेवा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यासाठी हा विशेष पुरस्कार दिला जातो. यंदा विविध क्षेत्रांतून ३० महिलांची निवड करण्यात आली होती. ठाण्यातील कोरेम मॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ठाण्यातील प्रख्यात महिला डॉक्टर, वागळे इस्टेटच्या पोलीस उपायुक्त आणि लोकमत ठाणे आवृत्तीचे उप-वृत्तसंपादक योगेश बिडवई यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
"हा सन्मान केवळ पुरस्कार नसून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आणि जबाबदारी वाढवणारा आहे," अशी भावना संध्या सामंत-सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा