सिंधुदुर्ग today



खतखरेदी होणार ‘स्मार्ट’ अन् पारदर्शक! ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रकल्प २० ऑगस्टपासून सिंधुदुर्गात लागू.


 सिंधुदुर्गनगरी, (ऋषिकेश मोरजकर) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खते वेळेवर, वाजवी दरात आणि सुलभतेने उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाचा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हा महत्त्वपूर्ण डिजिटल प्रकल्प दि. २० ऑगस्ट २०२६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू करण्यात येणार आहे.

 मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खताची मागणी नोंदविणे, उपलब्ध साठ्याची माहिती घेणे तसेच जवळच्या परवानाधारक विक्रेत्याकडून खताची खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे. या डिजिटल व्यवस्थेमुळे अनधिकृत साठेबाजी, कृत्रिम तुटवडा आणि खत खरेदीसाठी होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

 शेतकऱ्यांनी मोबाईलमधील Google Play Store वरून ‘Framework for Fertilizer Sale’ अॅप डाउनलोड करून नोंदणी करावी. नोंदणी करताना राज्याची निवड करून आधार क्रमांक व मोबाईलवर प्राप्त होणाऱ्या OTP द्वारे पडताळणी करावी. त्यानंतर स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती, पिकांचा हंगाम आणि शासकीय शिफारशीनुसार आवश्यक खतांच्या पिशव्यांची संख्या नोंदवून जवळच्या परवानाधारक खत विक्रेत्याची निवड करता येईल.

  शेतकरी स्वतः खत घेण्यासाठी जाऊ शकत नसल्यास प्रतिनिधीद्वारेही खरेदी करता येणार आहे. त्यासाठी अॅपमध्ये प्रतिनिधीची माहिती, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाची पडताळणी करावी लागेल. खताची मागणी नोंदवल्यानंतर अॅपवर QR कोड व टोकन क्रमांक प्राप्त होईल. हा QR कोड सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मागणी केलेला खतसाठा संबंधित कृषी सेवा केंद्रात तीन दिवसांसाठी शेतकऱ्याच्या नावाने राखीव ठेवण्यात येईल. तीन दिवसांच्या आत शेतकऱ्याने आपल्या सोयीनुसार संबंधित दुकानात जाऊन QR कोड स्कॅन केल्यानंतर खत व त्याची पावती प्राप्त करून घ्यावी.

 या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. तसेच संबंधित दुकानातील खतसाठ्याची उपलब्धता घरबसल्या तपासता येणार असल्याने वेळेची बचत होईल.

 अॅपचा वापर करताना किंवा खत खरेदीच्या प्रक्रियेत काही अडचण अथवा तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today