सिंधुदुर्ग today

 


संत नामदेवानी मालवणी गौळण लिहून.

भाषेचे महत्त्व पटवून दिले - अजय कांडर.

कवी अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे कणकवलीत प्रकाशन.

कणकवली/प्रतिनिधी

       संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे आराध्य दैवत आहेत. पण याच संत नामदेव महाराजांनी मालवणी गवळण लिहून आपल्याला भाषेचे महत्त्व पटवून दिल.संत नामदेव महाराज यांच्या विचारांची संवेदनशीलता मालवणी मुलखातील कवी अमेय मुळे यांच्या कवितेत सापडते. त्यांनी अधिक गंभीरपणे भविष्यात काव्य लेखन केले तर त्यांच्या काव्य लेखनाचा पुढील प्रवास अतिशय उज्वल आहे असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले. 

     हिंदू प्रकाशनने प्रकाशित केलेल्या कणकवली शहरातील कवी अमेय मुळे यांच्या 'काही ओलावलेली पाने ' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते करण्यात आले.'शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवली'तर्फे कणकवली शिवाजीनगर येथील  संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अभिनेते अभय खडपकर, सुहास वरुणकर, दयानंद मनोहर मुळे, ममता दयानंद मुळे, विनिता वरुणकर आदी उपस्थित होते.

       सुहास वरुणकर म्हणाले, अमेय हा अतिशय निष्ठेने कविता लिहितो. तो जे. जे.आर्टचा पदवीधर असून त्याने बनविलेल्या शॉर्ट फिल्म फार अप्रतिम आहेत. हीच संवेदनशीलता त्याच्या कवितेत उतरली असून त्याच्या या नव्या काव्यसंग्रहाला रसिकांचा प्रतिसाद मिळेल असा मला विश्वास वाटतो.अमेय मुळे म्हणाले,माझ्या या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता ही माझ्या आयुष्यातील एखाद्या क्षणाची, विचाराची किंवा भावनेची साक्ष आहे. यातल्या बऱ्याचशा कविता मी अनुभवलेल्या पहिल्या प्रेमाबद्दल बोलतात, काही नात्यांबद्दल, काही निसर्गाबद्दल, काही कवितेच्या सौंदर्याची अनुभूती देतात, तर काही समाजातील विसंगतींवर संघर्षावर प्रकाश टाकतात. काही कवितांमध्ये अपेक्षा आहे, तर काहींमध्ये जाणीव आहे. पण प्रत्येक कवितेच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे जगणे.कवी हा समाजापासून वेगळा नसतो. तोही त्याच समाजात जगतो, त्याच वेदना अनुभवतो, त्याच आनंदात सहभागी होतो. म्हणूनच कवितेमध्ये केवळ वैयक्तिक भावना नसतात, तर समाजाचे प्रतिबिंबही असते. साहित्य हे समाजाचा आरसा मानले जाते. त्या आरशात जे दिसते, ते कधी सुंदर असते, कधी अस्वस्थ करणारे असते; पण ते सत्य असते. कवीचे काम त्या सत्याला शब्द देण्याचे असते. म्हणूनच कविता ही केवळ साहित्यप्रकार नाही; तर ती जीवन समृद्ध करणारा एक सुसंस्कार आहे.

    यावेळी दयानंद मुळे यांनीही विचार व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today