सिंधुदुर्ग today



चांगल्या साहित्याचा निकष पुरस्काराने ठरत नसतो - कवी अजय कांडर.

कणकवली महाविद्यालयाच्या लेखन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली/ प्रतिनिधी 

    चांगल्या कवितेसाठी कवितेचे तंत्र महत्त्वाचं नसून कवितेचा आशय महत्वाचा ठरतो.कवितेचे तंत्र शिकून चांगली कविता लिहिता येत नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही चांगल्या साहित्याचा निकष साहित्यिकाला मिळालेल्या पुरस्काराने ठरत नाही. तर चांगला अभिजीत वाचक ज्या साहित्याला मिळतो ते लेखन उत्तम समजावे.यामुळे नव्या कवीनी कोणत्याही प्रकारचं साहित्य लेखन करताना लेखन ही आपल्या अभिव्यक्तीची गरज आहे, या जाणिवेतूनच लेखन करावे असे प्रतिपादन नामवंत कवी आणि प्रसिद्ध स्तंभ लेखक अजय कांडर यांनी येथे केले.

     कणकवली महाविद्यालयाच्या कणक नियतकालिक विभागातर्फे कविता ललित आणि कथा साहित्य प्रकाराची कार्यशाळा महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना कांडर यांनी कवीचा किंवा लेखकाचा जेवढा व्यक्तिगत संघर्ष तेवढी त्याची उत्तम लेखन करण्याची शक्यता जास्त. सुखशांती जीवन जगून उत्तम लेखन करता येत नाही असेही आग्रहणे सांगितले. माजी राजपत्रित अधिकारी सतीश लळीत यांच्या हस्ते उद्घाटन आणि प्राचार्य युवराज महालिंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कविता लेखन या विषयावर कवी अजय कांडर यांनी तर ललित लेखन या विषयावर ललित लेखिका आणि कवयित्री डॉ.सई लळीत यांनी तर कथात्म साहित्य या विषयावर कथा लेखक तथा प्रसिद्ध स्तंभ लेखक प्रा.डॉ. अनिल फराकटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पहिले कविता सत्र लेखक प्रा.डॉ.सोमनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी कणकवली महाविद्यालयातील पर्यवेक्षक महादेव माने उपस्थित होते.

         कवी कांडर पुढे म्हणाले की ,चांगल्या कवितेचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे, कवितेमध्ये जितक्या अधिक शक्यता असतात, जितके अधिक ‘अर्थाचे पदर’ असतात, तितकी ती कविता अधिक समृद्ध असते, अधिक दीर्घायुषी असते.कवी म्हणून आपण एखादा आशय लिहितो. पण त्या आशयाच्या अनेक शक्यता शोधणं, त्याला ‘खुलं’ ठेवणं, हेही आपल्या कामाचा भाग असतो. कविता एकाच अर्थामध्ये, एकाच पिंजऱ्यात बंदिस्त झाली, तर ती लवकर संपते. पण ती नवनव्या अर्थांना जन्म देत राहिली, प्रत्येक वाचकाला नव्याने भेटत राहिली, तर तिचा प्रवास पुढे चालू राहतो. ती ‘जिवंत’ राहते!कविता लिहिणं ही केवळ सौंदर्याची किंवा अभिव्यक्तीची गोष्ट नाही. कवी म्हणून आपण कोणत्या भूमिकेतून जगतो, कोणत्या मूल्यांवर उभे असतो, कोणत्या बाजूने उभे राहतो, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.  एखाद्या कवीची लेखन भूमिका डळमळीत झाली, त्याची नैतिकता घसरली, तर त्याच्या कवितेवरही त्याचा परिणाम होतोच होतो. शब्द आणि जगणं वेगळं असू शकत नाही.माणूस म्हणून आपण चुका करू शकतो. पण त्या चुका मान्य करण्याची प्रामाणिकता, ती हिंमत आपल्यात असली पाहिजे. कवीने स्वतःचा स्वाभिमानच गहाण ठेवला, पैशासाठी, पुरस्कारासाठी, पदासाठी लाचार झाला, तर तो चांगल्या कवितेकडे कसा जाईल? तो फक्त ‘मागणी तसा पुरवठा’ करेल!

      यावेळी  कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कणकवली महाविद्यालयाचे प्र प्राचार्य युवराज महालिंगे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सीमा हडकर यांनी केले. प्रस्ताविक प्रा.विजयकुमार सावंत यांनी केले.शेवटी आभार प्रा.माधुरी राणे यांनी मानले. यावेळी कनक नियतकालिक विभागातील प्राध्यापक व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today