सिंधुदुर्ग today
लेखन कार्यशाळेतून आलेले भान हे जीवनाचेही भान असते- डॉ. अनिल फराकटे.
कणकवली महाविद्यालयाच्या लेखन कार्यशाळेला डॉ. सई लळीत यांचेही मार्गदर्शन.
कणकवली/ प्रतिनिधी
वाङ्ममय लेखन कार्यशाळेसारख्या उपक्रमांची आज नितांत गरज आहे. अशा उपक्रमांमुळे संवेदनशील वयातील विद्यार्थी ललित साहित्याशी जोडले जातात. लेखन कार्यशाळेतून आलेले भान हे जीवनाचेही भान असते असे प्रतिपादन प्रसिद्ध स्तंभ लेखक आणि कथाकार प्रा. डॉ. अनिल फराकटे यांनी केले.
कणकवली कॉलेजमध्ये कनक नियतकालिक विभागातर्फे जिल्हास्तरीय वाङ्मय लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.यात ‘कथात्म वाङ्ममय’ या विषयावर प्रा. फारकटे यांनी मार्गदर्शन केले. वाङ्ममय लेखन सत्राच्या अध्यक्षस्थानी ‘कनक’चे संपादक डॉ. सोमनाथ कदम होते.तर याच वेळी ललित लेखन या विषयावर मार्गदर्शन ललित लेखिका डॉ. सई लळीत यांनी केले. यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे, कविता लेखन सत्राचे मार्गदर्शक कवी अजय कांडर, माजी राजपत्रित अधिकारी सतीश लळीत,पर्यवेक्षक महादेव माने, डॉ.सुरेश पाटील,प्रा. सीमा हडकर, प्रा. स्वीटी जाधव, प्रा. दीपा तेंडुलकर, प्रा. माधुरी राणे, प्रा. मीना महाडेश्वर, प्रा. प्रवीण कडूकर, प्रा. नेहा घोणे, प्रा. मनीषा मोरये , डॉ. उत्तम कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. फराकटे म्हणाले, गोष्टी सांगणे आणि ऐकणे हा आपला पूर्वापार वारसा आहे. कादंबरी जीवनाचा विस्तृत पट मांडते, तर कथा मर्यादित अवकाशात जीवनाचे प्रभावी दर्शन घडवते. चांगल्या कथेच्या निर्मितीसाठी कथानक, पात्रनियोजन,स्थळ-काळ-परिस्थिती, संवाद आणि सुसंगती या घटकांचे महत्त्व असते. लेखक आणि वाचक यांच्यातील संवादी दुवा म्हणून कथा-निवेदकाची भूमिका महत्वाची असते.
ललित लेखनासाठी अनुभूतीची जाणीव आवश्यक
डॉ. सई लळीत म्हणल्या ललित लेखनाला विषयाचे बंधन नसते. दैनंदिन जीवनातील साध्या अनुभवांपासूनही उत्तम ललित लेखन निर्माण होऊ शकते. मात्र त्यासाठी अनुभवाची आणि अनुभूतीची जाणीव आवश्यक असते. सूक्ष्म निरीक्षण, भरपूर वाचन आणि लेखकाचा व्यक्तिगत स्पर्श हे ललित लेखनाचे महत्त्वाचे घटक आहेत,
ललित लेखन मनावरील ताण हलका करणारे असते. दररोज किमान अर्धा तास वाचन केल्याने कल्पनाशक्ती विस्तारते, शब्दसंग्रह वाढतो आणि मनाची एकाग्रता विकसित होते. वाचनाच्या माध्यमातून एका आयुष्यात अनेक आयुष्ये जगता येतात, असे त्यांनी सांगितले. माहितीपर लेखन आणि ललित लेखनातील फरक स्पष्ट करताना ललित लेखन भावनांना स्पर्श करते आणि त्यात लेखकाचा ‘पर्सनल टच’ आवश्यक असतो.कार्यशाळेच्या समारोप सत्रात प्र.प्राचार्य युवराज महालिंगे व मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वीटी जाधव आणि प्रा. विजयकुमार सावंत यांनी केले, तर प्रा. विजय सावंत यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून १४३ विद्यार्थी आणि १७ प्राध्यापक सहभागी झाले होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा