सिंधुदुर्ग today

 


कवी विठ्ठल कदम यांना कवी नारायण सुर्वे पुरस्कार 

नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवी मुंबईच्या संस्थेतर्फे कदम यांचा गौरव.

सावंतवाडी/प्रतिनिधी

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे घेऊन जाण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे अग्रगण्य कार्यकर्ते आणि प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम यांना कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देण्यात येणारा कवी नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी मुंबई येथील साहित्य रसिक संस्थेतर्फे कवी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय काव्य पुरस्कार योजना आयोजित करण्यात आली होती. यात कवी कदम यांच्या 'फाळ ' या कवितेला नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दीड हजार रुपये ,स्मृतीचिन्ह , मानपत्र आणि ग्रंथ अशा स्वरूपाच्या या पुरस्कारासाठी पुरस्कार योजनेचे परीक्षक मराठी आणि हिंदीतील ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ. दामोदर मोरे यांनी कदम यांच्या 'फाळ ' या कवितेची सर्वोत्कृष्ट कविता म्हणून निवड केली.

      कविवर्य नारायण सुर्वे हे सिंधुदुर्गचे सुपुत्र. वैभववाडी तालुक्यातील हेत हे त्यांचे गाव. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवी मुंबई येथील साहित्य रसिक संस्थेतर्फे नारायण सुर्वे स्मृती काव्य पुरस्कार योजना आयोजित करण्यात आली आणि या उपक्रमात सिंधुर्गातीलच कवी विठ्ठल कदम यांना कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाला याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतून कवी विठ्ठल कदम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. कवी विठ्ठल कदम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध कवी आणि निष्ठावान सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत. सगळ्यांशी समन्वय ठेवून ते साहित्यिक काम करत असतात.सुमारे तीस वर्ष निष्ठेने ते काव्य लेखन आणि सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत करत आहेत. सध्या ते कविवर्य वसंत सावंत यांनी दक्षिण कोकणात सुरू केलेल्या पहिल्या साहित्य चळवळीचे म्हणजे सिंधुदुर्ग साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत असून साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर गावोगाव साहित्याच्या शाखा सुरू करणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या जबाबदारीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे अनेक कार्यक्रम त्यांनी यशस्वी केले आहेत. अलीकडेच सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.त्याच बरोबर नव्याने सुरू झालेल्या अपरान्त साहित्य मंडळाचे तसेच सम्यक साहित्य संसदचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहे.रूमणी काव्यसंग्रह प्रकाशित असून चिमण कथा कथासंग्रह अभ्यासक्रमात निवड झाली आहे.एकदा काय झाले हा  कथासंग्रह आणि चार पावलं दूर ही कांदबरी हे ग्रंथही त्यांचे प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर 'फाळ ' हा दीर्घ कवितेचासंग्रह त्यांचा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today