सिंधुदुर्ग today

 


आजच्या कवयित्रींचे काव्य लेखन आश्वासक - डॉ.आ.ह. साळुंखे.

प्रभा प्रकाशन कणकवली प्रकाशित कवयित्री मनीषा शिरटावले लिखित   'विसंवादाशी संवाद' काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

कणकवली/प्रतिनिधी

    आजच्या कवयित्रींचे काव्यलेखन आश्वासक असून आपल्या आजुबाजूच्या मुली साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणे, हे आम्हा मावळत्या पिढीसाठी अभिमानाची आणि समाधान देणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह.साळुंखे यांनी केले.  कवयित्री मनीषा शिरटावले यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीने प्रकाशित केलेल्या विसंवादाशी संवाद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.

      सातारा येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला लोकायत प्रकाशन, यशवंतनगर सातारा येथे आयोजित केलेल्या विसंवादाशी संवाद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ पत्रकार हरीश पाटणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, व्याख्याते प्रदीप कांबळे, इतिहास संशोधक डॉ. राजेंद्र घाडगे, सुप्रसिद्ध लेखक प्रल्हाद पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते.

        प्रा.यशवंत पाटणे म्हणाले, "कवयित्री मनीषा आपल्या कवितेत ज्योतिबा शोधत आहेत; पण आम्ही डॉ.साळुंखे तथा तात्यांच्यात हा ज्योतिबा पाहत आलो आहोत म्हणूनच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तात्यांच्या हस्ते इथे होत आहे याचा आनंद आहे. विसंवादाशी संवाद हा काव्यसंग्रह एक लढाई आहे.कवयित्रीने समाज व्यवस्थेविरुद्ध पुकारलेली लढाई,  स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी केलेली लढाई , व्यक्ती स्वातंत्र्यासाठीची लढाई  आहे आणि ही लढाई स्व सामर्थ्याची जाणीव असणारी कवयित्रीच करू शकते. परंपरेने दिलेले बांधलेपण झुगारून आत्मउद्धारासाठी सजग झालेली अशी कवयित्री म्हणजे मनीषा आहे. राजेंद्र घाडगे म्हणाले, समाजात आजही ज्या स्त्रिया सुशिक्षित झाल्या तरी अजूनही रूढी परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या दिसतात, त्यांच्या बाईपणातील दडलेला गूढ अर्थ उकलण्यासाठी ही कवयित्री "उभं राहायचं आहे, सारेच पाश तुझे तू  तोडत" या कवितेतून व्यक्त होत आहे. कुटुंबव्यवस्था नीट घडली, तर समाजमन घडतं . समाजमन घडलं,तर समाज व्यवस्था घडते आणि समाज व्यवस्था घडली, तर राष्ट्र घडते. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार कवयित्रीच्या कवितेमध्ये आलेला दिसून येतो. प्रल्हाद पार्टे म्हणाले, विसंवादाशी संवाद या फक्त कविता नाहीत. समाजातील वास्तव आहे.कवयित्रीची कविता समाजाशी थेट भिडणारी, प्रश्न विचारणारी आणि अंतर्मुख करणारी शब्दांची मशाल आहे. ती पुरुषसत्ताक मानसिकतेवर कठोर भाष्य करणारी आहे.यावेळी कांता  भोसले यांनी या काव्यसंग्रहातील " माझ्यातील विरांगना मीच "आणि हरीश पाटणे यांनी "न सुटणारा कोश" या कवितेचे  वाचन केले .

       सूत्रसंचलन जयमाला चव्हाण यांनी केले, तर कवयित्री मनीषा शिरटावले यांनी आभार मानले. यावेळी श्री.गजानन शिरटावले प्रा.शीला जाधव, सरिता शिंदे, प्रा.विश्वजीत जाधव ,प्रा. मस्के , श्री भोसले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today