सिंधुदुर्ग today
कवी डॉ.अमुल पावसकर यांच्या कवितेत राजकीय पडसाद - कवी अजय कांडर
'अनुभूती' काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी जिल्ह्यातील मान्यवर डॉक्टरांची उपस्थिती
लीलावती हॉस्पिटलच्या डॉ. अनिरुद्ध फडके यांनी जागवल्या मुंबई साहित्य सहवासच्या आठवणी
कणकवली/प्रतिनिधी
कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या अनुभूती काव्यसंग्रहातील कवितांमधून राजकीय पडसाद उमटलेले दिसत असून या संग्रहातील कवितेला कोणताच विषय वर्ज्य नाही. प्रेमापासून निसर्गापर्यंत, सामाजिकतेपासून राजकारणापर्यंत सगळेच विषय अनुभूती मधील कवितानी व्यापलेले दिसतात. यामुळेच अनुभूती मधील कवितांमधून जगण्याचे समग्रभान व्यक्त होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हयातील विख्यात सर्जन डॉ. अमुल पावसकर यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अनुभूती काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील मराठा सभागृहात आयोजित करण्यात आला. मुंबई लीलावती हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अनिरुद्ध फडके यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमात बोलताना कवी कांडर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना वेळेचा अभाव असतानाही डॉ. पावसकर निष्ठेने कविता लिहितात या बद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे असेही आग्रहाने सांगितले. यावेळी.डॉ मुक्तानंद गवंडळकर,
डॉ संजय सावंत,डॉ प्रफुल्ल आंबेरकर,डॉ राजेश नवांगुळ, प्रफुल्ल वालावलकर,डॉ हर्षदा देवधर,डॉ मिलिंद कुलकर्णी,डॉ गुरुराज कुलकर्णी,डॉ संजय निगुडकर,नकुल पार्सेकर, डॉ संजीव आकेरकर आदी वक्ते म्हणून उपस्थित होते.
अजय कांडर म्हणाले,जात आणि धर्म मार्तंडांच्या विरोधात या कवितेचा आवाज अधिक उंचीवर लागतो. हे समकाळाचे भान अपवादात्मक कवीकडे असतं आणि असाच कवी चांगली कविता लिहू शकतो. सध्या देशात जे चालू आहे त्याचे प्रतिबिंब डॉ. पावसकर यांच्या कवितेत दिसत.कोणत्याही एका राजकीय विचाराशी या कवितेची बांधिलकी नाही.त्यामुळे राजकारणातील अनिष्ट आणि अपप्रवृत्ती विषयी सडेतोडपणे या कवितेतून भाष्य वाचायला मिळते. हे असं लिहिण्यासाठी धाडस तर लागत परंतु कवी आतून प्रामाणिक असल्याशिवाय, समाजाबद्दल पोटतिडकीने काही बोलावसं वाटल्याशिवाय हे लिहिणे शक्य नाही.या कवितेत प्रेमाबरोबर समाजातील हिंसा, भ्रष्टाचार, राजकीय हैदोस, जगण्याची निराशा, शोषितांचे प्रश्न, दीनदुबळ्यांबद्दलची करुणा अस सगळच मांडण्यात कवी पावसकर यशस्वी झाले आहेत.
कवी पावसकर यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झाल्यामुळे एक सम्यक दृष्टी त्यांच्या कवितेत दिसून येते. सम्यक म्हणजे जगाकडे बुद्धाच्या नजरेने पाहणे.समपातळीवर पाहणे. कोण लहान कोण थोर असं नाही तर सर्व समांतर. अनुभूती या काव्यसंग्रहातील कवितेत आपल्याला याचा प्रत्यय तीव्रतेने येतो.एका साध्या भाकरी बद्दलची कविता लिहून कवी जगण्याचा मतितार्थ आपल्याला सांगतो. त्यामागील दारिद्र्य दुःख वेदना अशा संपूर्ण परिस्थितीचे भान लक्षात आणून देतो. हेच तर कवीचे कार्यकर्तव्य असतं.
डॉ. अनिरुद्ध फडके म्हणाले, कवी पावसकर यांनी आपल्या कवितांमधून जगण्याच्या सगळ्या विषयाला स्पर्श केला आहे. त्यामुळे वेगवेगळे अनुभव त्यांच्या कवितेत वाचायला मिळतात. मुंबई साहित्य सहवास मध्ये आमचे बालपण गेले विंदा कंदीकर यांच्या सहवासात आम्ही वाढलो. विंदा कंदीकर अतिशय साधे राहायचे. एवढा मोठा कवी आमच्या सारख्या लहान मुलांबरोबर खेळायचा. ही जगण्याची सहजता कवी पावसकर यांच्या जगण्यात आढळत असल्यामुळे त्यांची कविता सहज सोप्या भाषेत आपल्याला वाचायला मिळते. यावेळी डॉ मुक्तानंद गवंडळकर,डॉ संजय सावंत,डॉ प्रफुल्ल आंबेरकर,डॉ राजेश नवांगुळ, प्रफुल्ल वालावलकर डॉ हर्षदा देवधर,डॉ मिलिंद कुलकर्णी,डॉ गुरुराज कुलकर्णी,डॉ संजय निगुडकर,नकुल पार्सेकर,डॉ संजीव आकेरकर आदींनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. आकेरकर यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. कादंबरी पावस्कर यांनी स्वागत केले. कवी डॉ. अमोल पावसकर यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा