सिंधुदुर्ग today



भाषा उच्चशिक्षितांनी संपवली आणि अडाण्यांनी जपली.

माझं जगणं माझी भाषा ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन.

कणकवली/प्रतिनिधी

        समाज ज्यांना अडाणी समजतो त्याच वर्गाने जगातील कोणतीही बोलीभाषा जपली आहे. तर उच्चशिक्षित वर्गाने भाषा शुद्धीकरणाच्या नावाखाली प्रमाणभाषेलाच सर्वाधिक महत्त्व दिले. मात्र बोली जपल्या गेल्या तरच प्रमाणभाषा टिकते हे भान या उच्चशिक्षित वर्गाने न जपल्यामुळे उच्चशिक्षित वर्गाने भाषा संपवली या निष्कर्षापर्यंत आपण येऊ शकतो असे स्पष्ट प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी 'आपलं जगणं आपली भाषा' या व्याख्यानात केले.

      मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात कवी अजय कांडर यांचे 'माझं जगणं माझी भाषा ' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यानिमित्ताने बोलताना कांडर यांनी जेवढा समाज उच्चशिक्षित आणि श्रीमंत होत जातो तेवढा तो भाषेपासून दूर जात असतो असेही निरीक्षण नोंदविले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी विलास कोळपे, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, उपप्राचार्य श्रीमती आठले, उपप्राचार्य श्रीमती कदम, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.शिवराज गोपाळे,प्रा.निधी पटवर्धन, श्रीमती प्रा.वीर, प्रा.खांडेकर आदी उपस्थित होते.

  श्री कांडर म्हणाले, एक भाषा संपते तेव्हा एक समाज संपलेला असतो. मात्र समाजाचे भरण पोषण करण्याची ज्या वर्गावर जबाबदारी असते त्याच वर्गाला याची जाणीव नसते. त्यामुळे विख्यात भाषातज्ञ डॉ.गणेश देवी यांच्या संशोधनानुसार आपल्या देशातल्या शेकडो बोलीभाषा संपलेल्या आहेत.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भाषेबद्दलची आस्था सत्तेवर येणाऱ्या कुठल्याही व्यवस्थेला नाही.भाषेच्या विकासासाठी देशभरातील अनेक प्राचीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.मात्र शासन स्तरावर या भाषांची जपणूक करण्यासाठी पुरेसा निधी दिला जात नाही. भाषा गौरवाच्या दिनी हौशीच्या पातळीवर भाषेचे कार्यक्रम करणे म्हणजे भाषा जपणुकीचे उपक्रम नव्हेत. खूप वर्षाच्या आग्रही मागणीनंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला खरा, मात्र त्यानंतर आजतागायत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाकडून कोणत्याही प्रकारे निधी मिळालेला नाही. ही भाषेबद्दलची उदासीनता फक्त राजकीय पातळीवरच आहे असे नाही तर भाषा जपणुकीसाठी जे घटक महत्त्वाचे मानले जातात त्यांच्यातही ही भाषेबद्दलची उदासीनता दिसून येते आहे. साहित्यिक कलावंत, भाषेचे प्राध्यापक यांची भासेच्या संदर्भातली उदासीनता भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी त्रासदायकच आहे. जे साहित्यिक स्वतःच्या भाषेत लेखन करतात, नावलौकिक मिळवितात आणि मान सन्मान प्रतिष्ठा पैसा मिळवूनही त्यांची मुलं मात्र इंग्रजी माध्यमात शिकत असतात. तीच परिस्थिती अपवाद वगळता मराठी भाषा प्राध्यापकांची. त्यामुळे यापुढे आपल्या भाषेचे संवर्धन सर्वसामान्य माणूसच करेल.मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी ती भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक महत्त्वाची भाषा आहे. जगभरात 83 दशलक्षांहून अधिक लोक मराठी बोलतात. असे अभ्यासक सांगतात.भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या यादीत मराठी अग्रस्थानी आहे. मराठी भाषेचे सौंदर्य तिच्या वैविध्यपूर्ण बोलींमध्ये दडलेले आहे.एकूण 42 बोली भाषांमध्ये विभागलेली मराठी भाषा, वैदर्भी, झाडी बोली, कोकणी आणि खान्देशी अशा विविध रूपांत कानावर पडते. या भाषेचे व्याकरण आणि मूळ हे प्राकृत तसेच पाली या प्राचीन भाषांशी जोडलेले आहे, ज्यामुळे तिला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे.म्हणूनच ती प्राचीन असून एक अभिजात भाषा म्हणून ती समृद्धच आहे. मात्र यापुढे या भाषेच्या बोली नष्ट झाल्या तर मराठी भाषा धोक्यात येऊ शकते हाही विचार मराठी समाजाने करणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today