सिंधुदुर्ग today
सत्य सांगणारा साहित्यिक भ्रष्ट सत्तेच्या विरोधातच असतो.
दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष अजय कांडर यांचे प्रतिपादन.
कणकवली /प्रतिनिधी
साहित्यिक आणि सत्ताधारी व्यवस्था यांचे सख्य कधीच नसते. कारण लेखक कवीला समाजातील सत्य सांगून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभे राहायचे असते आणि सत्ताधारी व्यवस्था नेहमीच समाजाला गृहीत धरून काम करत राहत असते.त्यामुळेच सत्य सांगणारा साहित्यिक भ्रष्ट सत्तेच्या विरोधातच असतो. आज मात्र या उलट झालं असून साहित्यिक आणि सत्ताधारी व्यवस्था मांडीला मांडी लावून बसत असल्यामुळे समाज साहित्यिकांकडूनही आणि सत्ताधारी व्यवस्थेकडूनही अपेक्षा बाळगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना येथे केले.
सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे दुसरे सम्यक संबोधी साहित्य संमेलन शहरातील नगर वाचनालयाच्या सभागृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना कांडर यांनी स्वायत्तता टिकून ठेवणे ही सरकारचीही जबाबदारी असते.मात्र आता सत्ताधारी व्यवस्थाच साहित्य संस्कृती संस्था ताब्यात घ्यायला निघाल्या असल्याचाही आरोप त्यांनी केला.मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विनय साळुंके यांनी संमेलनाचे उद्घघाटन केले.यावेळी साहित्य संस्कृती अग्रगण्य कार्यकर्ते मधुकर मातोंडकर, कवी मोहन कुंभार, ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम, सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे अध्यक्ष कवी किशोर डी.कदम, कार्यवाह सूर्यकांत साळुंके, लेखक संजय तांबे, पुरस्कार विजेत्या कवयित्री डॉ. योगिता राजकर, कवयित्री विद्या पाटील संस्थेच्या कोषाध्यक्ष नेहा कदम, उपाध्यक्ष संदीप कदम, संस्थेचे इतर पदाधिकारी सत्यवान साटम, संतोष कदम, शशिकांत तांबे आदी उपस्थित होते.यावेळी कवयित्री योगिता राजकर यांना सम्यक संबोधी काव्य पुरस्कार तर कथाकार महावीर कांबळे यांना बाबुराव बागुल पुरस्कार आणि कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार संमेलनाध्यक्ष अजय कांडर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
श्री कांडर म्हणाले, चांगल्या लेखनाचा शोध घेण्यासाठी सतत समाजाशी जोडून राहायला हवे, लेखकाचे समाजाशी नाते तुटले तर लेखक समाजाबद्दलच भाष्य लेखनातून करणार कसे? लेखक, कवी प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनत चालला की तो फक्त मनोरंजनाचे लेखन करू शकतो किंवा तथाकथित कलावादी भूमिका घेऊन आपण किती श्रेष्ठ लिहितो असेच भाष्य करत राहतो. कलावादी भूमिका घेऊन लिहिणारा कधीही समाजाच्या भल्याच लिहिलं नाही किंवा साहित्यिकाचे समाजाशी काही देणेघेणे असते हाही विचार स्वीकारला नाही. मात्र मराठी साहित्यात दलित साहित्याने ही कोंडी फोडली म्हणून दलित साहित्याची दखल राष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक घेतली गेली. परंतु दाढी वाढविणे,झब्बे,कोट घालणे अशा प्रकारे पोशाखी लेखक कवी झाल्याने त्यांचं जगणंही पोशाखी झालं आणि यातून आपण कुठल्या वर्गाच्या बाजूने आपल्या लेखनातून उभे राहिला पाहिजे याचं भानच लेखक कवींचं सुटलं. तरीही जे अपवादाने समाजाच्या बाजूने लिहीत आहेत, भ्रष्ट सत्ताधारी व्यवस्थेच्या विरोधात रस्त्यावर येऊन लढाई लढत आहे त्यांची मात्र असेच लेखक कवी चेष्टा करू लागले. यातून एकूण मराठी साहित्यातच नुकसान झालेले आहे. अशा काळात सम्यक संबोधी सारखी साहित्य संस्था परिवर्तन साहित्याचा विचार घेऊन संमेलन आयोजित करते ही कौतुक करण्यासारखी घटना असून या संस्थेच्या उपक्रमांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते पाठबळ द्यायला पाहिजे. किशोर कदम म्हणाले सम्यक संबोधी साहित्य संस्था ही गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र परिवर्तन विद्रोही हाच विचार या संस्थेच्या केंद्रस्थानी असणार आहे. तुम्ही जेव्हा एखादी नवी गोष्ट करता तेव्हा छोट्या मनाची माणसं तुमच्यापासून दूर जातात.पण अशाही वेळ आपल्याला सर्वांसाठी काम करायचं असतं हीच भावना घेऊन आम्ही ही संस्था कार्यरत ठेवणार आहोत. यावेळी कवी विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात मोहन कुंभार, श्वेतल परब, ऋतुजा सावंत भोसले, पी एल कदम, निशिगंधा गावकर, हरिश्चंद्र भिसे, सागर कदम, रामचंद्र शिरोडकर, संचिता चव्हाण, संदेश तुळसणकर, सायली नारकर,अमर पवार, नंदिनी रावराणे पवार, श्रवण वाळवे, संदीप कदम, कदम, प्रगती पाताडे, सुरेश पवार, रीमा भोसले, नरेंद्र कुमार चव्हाण, शशिकांत तांबे, सिद्धेश खटावकर आदी कवीनी कविता सादर केल्या. संदेश तांबे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार संदीप कदम यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा