सिंधुदुर्ग today
होळी रे होळी ... पुरणाची पोळी...!!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुलीवंदनानिमित्त रंगांची उधळण ; सर्व तालुक्यांत उत्साहाचे वातावरण
कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)
कोकणातील शिगमोत्सवाला पारंपारिक थाट आहे. होळी उभारल्यानंतर रंगोत्सव म्हणजेच धुलीवंदन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग या सर्व तालुक्यांमध्ये नागरिकांनी रंगांची उधळण करत सणाचा आनंद लुटला.गावोगावी रंगांची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि डिजेच्या तालावर होळी रे होळी ... पुरणाची पोळी ... , बुरा न मानो होली है ... च्या घोषणांनी वातावरण रंगून गेले होते.
धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी सायंकाळी विधीपूर्वक होळीचे पुजन तसेच दहन करत पारंपारिक पध्दतीने वाईट प्रवृत्तींचा नाश आणि सद्गुणांचा विजय याचे प्रतीक म्हणून गावोगावी होळी पेटवण्यात आली. महिलांनी पारंपरिक पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
धुलीवंदनाच्या दिवशी सकाळपासूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकमेकांना गुलाल व रंग लावत आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्ये आणि डीजेच्या तालावर युवक-युवतींनी नृत्य करत जल्लोष केला. समुद्रकिनारी भागातही पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी उत्साहात रंगोत्सव साजरा केला.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. नागरिकांनीही शांततेत व सुरक्षिततेत सण साजरा करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. धुलीवंदनाच्या रंगोत्सवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र आनंद, बंधुभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कणकवली , कलमठ बिडयेवाडी येथील लहान मुलांसह महिला , पुरुषांनी या धुलीवंदनानिमित्त रंगांची उधळण केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा