सिंधुदुर्ग today
जानवलीतील कवी सत्यवान साटम आणि कवी संदीप कदम यांचे काव्यवाचन
कवी साटम, कवी कदम यांच्या कवितांचा 'सिंधुदुर्गची नवी कविता' काव्यग्रंथातही समावेश
कणकवली/प्रतिनिधी
सिंधुदुर्गातील नव्या कवींच्या कवितांचा समावेश असलेल्या 'सिंधुदुर्गची नवी कविता' या काव्यग्रंथाचे मालवण येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद साहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष समीक्षक प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यात जाणवलीतील नवोदित कवी सत्यवान साटम आणि संदीप कदम यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी राज्यस्तरावरच्या विविध मान्यवर कवींच्या सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात कवी साटम आणि कवी कदम यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळवला.
'सिंधुदुर्गची नवी कविता' हा ग्रंथ कवी अजय कांडर यांच्या संकल्पनेतून प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून या ग्रंथाचे संपादन समीक्षक प्रा. संजीवनी पाटील आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी केले आहे. समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या माध्यमातून कोकणबरोबरचे महाराष्ट्रातील नव्याने लिहिणाऱ्या कवींची काव्य गुणवत्ता वाचकांसमोर यावी या एकमेव हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गची नवी कविता हा १६ कवींचा कवितांचा सहभाग असलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. यात कवयित्री प्रियदर्शनी पारकर म्हाडगुत, डॉ. दर्शना कोलते, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, किशोर कदम, चेतन बोडकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत-भोसले, योगिता शेटकर, प्रा. संतोष जोईल, दिलीप चव्हाण, पल्लवी शिरगावकर, सुरेश बिले, रचना रेडकर, मंगल नाईक-जोशी,संदीप कदम आणि सत्यवान साटम, यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा समावेश आहे. कवी सत्यवान साटम आणि संदिप कदम दोन्ही जानवली गावचे सुपुत्र. यांच्या प्रत्येकी पाच कवितांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला हा जाणवली गावचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया या गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कवी सत्यवान साटम यांनी प्रथमच व्यासपीठावर सुंदर कवितेच सादरीकरण केले.कवी साटम आणि संदिप कदम यांनीही उत्तम कविता लेखन करून मराठी साहित्यात पुढे जावे अशी अपेक्षाही जाणवली ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा