सिंधुदुर्ग today


ओव्हरलोड व भरधाव वेगातील वाहतुकीला पायबंद घाला.

... अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा इशारा.

कणकवली | प्रतिनिधी 

आचरा, देवगड, विजयदुर्ग भागातून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड गाड्या चिऱ्यांची वाहतूक करतात. या गाड्या चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात असतात. अलिकडेच तोरसोळे येथे झालेला अपघात हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे याला पोलीस, महसुल व आरटीओ विभागाने पायबंद घालण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही न झाल्यास गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.

आचरा भागात आडवली, श्रावण व इतर भागात चिरेखाणी आहेत. तर देवगडमध्ये तोरसोळे, विजयदुर्गमध्ये वाघोटन व इतर भागात असलेल्या या सर्व चिरेखाणींवरून परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होते. नियमानुसार ही वाहतूक करण्यास आमचा विरोध नाही. परंतु, परराज्य अथवा परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. यात बऱ्यापैकी वाहने ही १६ चाकी ट्रक आहेत. स्पर्धेच्या काळात ही वाहने चिरे भरण्यासाठी जात असताना भरधाव वेगात जातात. गेल्या आठवड्यात तोरसोळेच्या अपघातात तळेबाजार येथील आई व मुलाचा दुदैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर लोकांचा झालेला उद्रेक प्रशासनाने पाहिलेला आहे.

आपल्याकडील रस्ते मोठे नाहीत, अरूंद रस्त्यांवरून ही वाहने भरधाव वेगात धावत असतात. तसेच अनेक ठिकाणी रस्ते वळणाचे असल्याने भरधाव वेगातील वाहने आवरणे कठिण जाते. या मार्गावर काही ठिकाणी शाळाही आहेत. भरधाव वेगातील वाहनांपासून शालेय विद्यार्थ्यांनाही धोका उद्भवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अशा ओव्हरलोड तसेच भरधाव वेगातील वाहनांना प्रतिबंध करण्याची गरज आहे. तसेच असे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी उपाययोजनाही करण्याची गरज आहे. ही सर्व जबाबदारी, पोलीस, महसुल व आरटीओ विभागाची आहे. कणकवली, मालवण व देवगड तालुक्यातील संबंधित यंत्रणांनी याबाबत गांभीर्याने घेऊन उपाययोजना केल्या पाहितेत. मात्र, अशा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसते. त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी गणेशोत्सव संपेपर्यंत याबाबतच्या उपाययोजना करून या वाहतूकीला प्रतिबंध करण्याची आमची मागणी आहे. तसे न झाल्यास गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरावे लागेल, असेही श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today