सिंधुदुर्ग today
'मास्तरांची सावली' साहित्य पुरस्कार जाहीर
डॉ प्रदीप आवटे, प्रा सुजाता राऊत,डॉ. योगिता राजकर, सुनील उबाळे, सफरअली इसफ, मधुकर मातोंडकर यांचा समावेश
स्वामीराज प्रकाशनच्या रजनीश राणे यांची माहिती
कणकवली/प्रतिनिधी
मुंबई येथे १ मार्च रोजी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मरणार्थ 'सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. स्वामीराज प्रकाशन मुंबई आणि प्रभा प्रकाशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या निमित्ताने साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यात पुणे येथील लेखक डॉ.प्रदीप आवटे, मुंबई येथील लेखिका प्रा. सुजाता राऊत, वाई येथील कवयित्री डॉ.योगिता राजकर, छ. संभाजीनगर येथील कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे, सोलापूर येथील कवी सफरअली इसफ आणि सिंधुदुर्ग येथील सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांचा समावेश असल्याची माहिती स्वामीराज प्रकाशनचे संचालक रजनीश राणे यांनी दिली
कविवर्य नारायण सुर्वे यांनी मुंबईतील कामगार वर्ग विशेषत: गिरणी कामगार यांना आपल्या कवितेच्या केंद्रस्थानी आणून त्यांची सुखदुःखे मांडली.'कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे '... असं आपल्या कवितेद्वारे म्हणून सुर्वेंनी कष्टकरी - शोषित वर्गाला न्याय देण्याचाही प्रयत्न केला. विद्यापीठाची पायरीही न चढलेल्या सुर्वे यांची कविता मात्र विद्यापीठाची मानबिंदू ठरली. या त्यांच्या ऋणाची आठवण ठेवण्यासाठी स्वामीराज प्रकाशन आणि प्रभा प्रकाशनातर्फे आयोजित सुर्वे मास्तरांचे संमेलन निमित्त 'मास्तरांची सावली' या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.यात डॉ. प्रदीप आवटे यांच्या सकाळ प्रकाशन प्रकाशित 'आणखी एक स्वल्पविराम' या कुमार कादंबरीला, प्रा. सुजाता राऊत यांच्या सृजन संवाद प्रकाशन प्रकाशित 'मातीत मिसळण्याची गोष्ट' या ललित लेख संग्रहाला, डॉ. योगिता राजकर यांच्या सृजन प्रकाशन प्रकाशित 'बाईपण' या दीर्घ काव्यसंग्रहाला, कामगार वर्गातील कवी सुनील उबाळे यांच्या गोदा प्रकाशन प्रकाशित 'उलट्या कडीचं घर' या काव्यसंग्रहाला आणि मधुकर मातोंडकर यांना त्यांच्या एकूण सांस्कृतिक - साहित्यिक चळवळीतील योगदानासाठी 'मास्तरांची सावली' पुरस्कार देण्यात आले असून १ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या सुर्वे मास्तरांच्या संमेलनात सदर पुरस्काराने पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. राणे यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा