सिंधुदुर्ग today
जातीच्या पलीकडे आंबेडकर विचार मानणारा कोणताही साहित्यिक आपला मानायला हवा - प्रवीण बांदेकर
पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कवी सफरअली इसफ यांना सम्यक संबोधी काव्य पुरस्कारही प्रदान
कणकवली/प्रतिनिधी
लेखक आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्त्यांनी चुकीचे आदर्श निर्माण करू नयेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मानणारा कोणत्याही जातीतील, धर्मातील असलेला प्रत्येक लेखक, कार्यकर्ता संघटित करण्याची जबाबदारी आंबेडकरवादी संस्थानी ठेवायला हवी. लेखक शरणकुमार लिंबाळे यांनी आरएसएसच्या विचारधारेशी बाबासाहेब यांच्या अनुयायानी जुळून घ्यायला हवे हे केलेले विधान संधीसाधूपणाचे असून आज देशात जे काही घडत आहे त्यासाठी सम्यक संबोधी साहित्य संस्थेच्या अशा छोट्या संमेलनांची खरी गरज आहे. यासाठी सम्यक संबोध साहित्य संस्थेचे किशोर कदम आणि त्यांचे सहकारी यांचे मी कौतुकच करतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी येथे केले.
सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे पहिले साहित्य संमेलन कादंबरीकार बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील फ्लोरेट कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. अग्रगण्य सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या संमेलनात बोलताना श्री बांदेकर यांनी परिवर्तन साहित्य चळवळीतील गट तट, आजचे सत्ताधारी राजकारण, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक प्रदूषणकारी वातावरण यासंदर्भात सडकून टीका केली.आणि स्वतःला खरवडून काढण्यासाठी लेखकाकडे आता निवांतपणा नाही.तरीही आपल्या संवेदनांचा झरा आटू न देता लेखन करत राहायला हवं असेही आवाहन केले. यावेळी कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सध्याच्या बहुचर्चित 'अल्लाह ईश्वर' या काव्यसंग्रहाला सम्यक संबोधी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांनी उद्घघाटन केलेल्या या संमेलनाला सम्यक संबोधी संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम,सचिव सूर्यकांत साळुंखे, उपाध्यक्ष संदीप कदम, कोषाध्यक्ष नेहा कदम, सत्यवान साटम, धम्मपाल बाविस्कर, संतोष कदम, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, सुप्रसिद्ध लेखक संजय तांबे, माजी माहिती उपसंचालक सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत, प्रसंवाद या नियतकालिकाचे संपादक आणि आंबेडकर साहित्य चळवळीतील कार्यकर्ते कवी अनिल जाधव, साहित्य संगीत मित्र मंडळ सिंधुदुर्गचे महेंद्र चव्हाण, सुभाष भंडारे, प्रमीता तांबे आदी उपस्थित होते.
श्री मातोंडकर म्हणाले, सम्यक संबोधी या नावातच समानता आहे.त्यामुळे या संस्थेला नेमकं कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे हा उद्देश स्पष्ट होतो. अनेक परिवर्तनवादी संस्था स्थापन केल्या जातात. त्यातून पुरस्कार दिले जातात.मात्र ते कार्यक्रम स्वतःच्या कौटुंबिक पातळीवरच केले जातात. कुटुंबातलीच माणसं मंचावर घेऊन त्यांना प्रतिष्ठा- प्रसिद्धी कशी मिळेल हे पाहिले जाते. इथे मात्र वेगळंपण आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागातील कार्यकर्त्यांना एकत्र करून ही संस्था कार्यरत आहे. त्यामुळे सम्यक संबोधी या संस्थेला भवितव्य आहे. किशोर कदम म्हणाले, साहित्य चळवळ राबवताना कार्यकर्त्यांचे मन छोटे असता नये. त्यांची भूमिका व्यापक हवी.जो माणूस फक्त माणूस म्हणून जगू पाहतो त्याला आपलं म्हणायला हवं. हा लहान, हा थोर असा भेद न करता सर्वसमावेशक भूमिका घेऊन साहित्य चळवळ राबविली जायला हवी. छोटे छोटे गट साहित्यात कार्यरत आहेत. त्यांच्या छोट्या छोट्या संस्था काम करतात. त्या छोट्या छोट्या संस्थांमध्ये छोटे छोटे पदाधिकारी आपणच मोठे आहोत अशा मनोवस्थेत वावरत असतात. अशावेळी त्यांचं त्यांना काम करू द्यायचं. त्यांच्याविषयी कुठलाही अनुदगार न काढता आपण आपल्या चळवळीची रेष मोठी करायची. यातच सगळ्यांचं भलं असतं. हाही उद्देश सम्यक संबोधी साहित्य चळवळ सुरू करण्यामागे आहे. यावेळी कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित करण्यात आले. त्यात नव्या जुन्या कवीनी आपल्या कविता सादर करून संमेलनाची उंची वाढविली.
सूत्रसंचालन निलेश पवार आणि संदीप कदम यांनी केले. प्रस्तावना सूर्यकांत साळुंखे यांनी केली. आभार धम्मपाल बाविस्कर यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा