सिंधुदुर्ग today



संजय तांबे यांच्या 'समाजभान' ग्रंथाचे

२५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

कवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती

कणकवली/प्रतिनिधी

       फोंडाघाट येथील प्रसिद्ध लेखक आणि कवी संजय तांबे यांच्या 'समाजभान' या वैचारिक ग्रंथाचे प्रकाशन बुधवार 25 डिसेंबर रोजी फोंडाघाट - सिद्धार्थ नगर - नालंदा बुद्ध विहारच्या सभागृहात दु. ३ वा. प्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बौद्ध विकास मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा फोंडाघाटतर्फे आयोजित करण्यात आलेला हा प्रकाशन सोहळा सामाजिक कार्यकर्ते तथा फोंडाघाटचे माजी सरपंच मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

      संजय तांबे हे मूळचे कवी असून ते गेली अनेक वर्ष विविध नियतकालिके, दिवाळी अंक आणि वृत्तपत्र या माध्यमातून सातत्याने वैचारिक लेखन करत आहेत. त्यांच्या वैचारिक लेखनाला अनेक पारितोषिके प्राप्त झाली असून यापूर्वीही त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. आता गेल्या अनेक वर्षातील वैचारिक लेखनाचा 'समाजभान' हा ग्रंथ प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आला असून सदर ग्रंथाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. अमरावती येथील विख्यात विचारवंत डॉ. अशोक नामदेव पळवेकर यांची प्रस्तावना समाजभान या ग्रंथाला लाभली आहे. डॉ. पळवेकर आपल्या प्रस्तावनेत म्हणतात श्री तांबे यांच्या 'समाजभान' या ग्रंथातून जे चिंतन मांडले गेले आहे. त्याला निश्चित एक वेगळी मौलिकता प्राप्त झालेली आहे. कारण त्या लेखनाच्या मुळाशी एक निश्चित स्वरूपाची तत्त्वदृष्टी आहे. ती तत्त्वदृष्टी आंबेडकरवादाच्या मुशीतून उद्भभूत झालेली आहे.

तसेच समाजभान  या ग्रंथातून तांबे यांनी सभोवतालात घडणाऱ्या घटना, प्रसंगांचे आणि विचार वर्तनाचे जे आकलन मांडले आहे त्या मांडणीला वैचारिक दृष्टीने एक निश्चित प्रकारची भूमिका आणि मूल्य दृष्टी आहे.त्यामुळे हा ग्रंथ मराठी साहित्यात महत्त्वाचा असून त्याचे मोल समजूनच वाचकांनी सदर ग्रंथ वाचायला हवा. तर सुप्रसिद्ध कादंबरीकार प्रवीण बांदेकर यांनी या ग्रंथाची पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात,तांबे यांनी या ग्रंथातून सामान्य भारतीय नागरिकाच्या नजरेतून या देशातील राजकारण, अर्थकारण, सामाजिक व सांस्कृतिक घटना, स्त्रियांचे प्रश्न आदींविषयी  आपली प्रामाणिक व परखड निरीक्षणे नोंदविली आहेत.तरी या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा फोंडाघाटतर्फे करण्यात आले आहे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today