सिंधुदुर्ग today



कवयित्री डॉ.योगिता राजकर यांचा 'बाईपण' दीर्घ काव्यसंग्रह प्रकाशित

मुंबई सृजन प्रकाशनातर्फे संग्रह प्रकाशित

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी

      कोकणच्या साहित्य चळवळीतून कोकणच्या विविध सांस्कृतिक  उपक्रमाशी जोडल्या गेलेल्या तथा सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानच्या पदाधिकारी  प्रसिद्ध कवयित्री आणि ललित लेखिका डॉ. योगिता राजकर (वाई) यांचा मुंबई येथील सृजन प्रकाशनातर्फे 'बाईपण ' हा दीर्घ काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. मराठीत अपवादात्मक कवयित्रींनी दीर्घ कविता लिहिली असून आता या परंपरेत डॉ. राजकर यांच्या 'बाईपण ' या दीर्घ कवितेची नोंद घेतली जाणार आहे.

       डॉ. राजकर या मराठीतील 2000 नंतरच्या पिढीतील महत्त्वाच्या कवयित्री असून महत्त्वाची वांड:मय नियतकालिके आणि प्रतिष्ठित दिवाळी अंक यामधून त्यांच्या कविता गेली काही वर्ष सातत्याने प्रकाशित होत आहेत. आता त्यांचा हा दीर्घ कवितेचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून बाईपणाच्या समग्र जगण्याला ही दीर्घ कविता कवेत घेते. त्याचबरोबर बाईचे शोषणाचे विविध वयातील आणि विविध सामाजिक स्तर या दीर्घ कवितेतून चिंतनाच्या पातळीवर उलगडत जातात. विख्यात लेखिका इंदुमती जोंधळे यांनी बाईपण या काव्यसंग्रहाची पाठराखण केली असून त्या म्हणतात, स्त्रीविषयीची  अनितीमान संस्कृती  या  काव्यातून प्रतिबिंबीत होते.सर्जनक्षमतेच्या साम्य स्थळांवर माती लोटून ,ती माती कपाळाला लावणाऱ्या ढोंगी संस्कृतीचे वाभाडे काढणारी डाॅ.योगिता यांची ही कविता आहे.'बाईपण' आणि तिच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न केवळ स्री मनाभोवती कोरलेले नसून एकूणच  स्री यातनेचा धांडोळा  घेणाऱ्या ,गुंता सोडविणाऱ्या मनस्विनीचे ते काव्यरुपी  मनोगत मराठी काव्यात नक्कीच वेगळे मर्म सांगणारे आहे. कवयित्रीची शब्दकळा अल्प शब्दात मोठ्ठा  आशय  सांगणारी किमयाच आहे.स्री मुक्त्तीचा मार्ग  सांगत सांगत स्रीवादी समीक्षेला एक प्रकारचे हे आव्हानच दिलेले आहे.स्रीच्या बाबतीत संत नेमके काय सांगतात आणि प्रत्यक्ष वास्तवात  नेमके काय आहे ? याचे भानतत्त्व ही कविता देते.ती स्वतःचा गौरव करीत नाही वा मोठेपणाही मिरवत नाही, स्वतःच्या ऋचेत ही कविता स्रीचे अंतरिक्ष कमीत कमी आणि चपखल शब्दात मांडत वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते.कवयित्रीच्या शब्दकळेतून सत्ता, समाज, आणि संस्कृतीचे होणारे सम्यक दर्शन प्रत्येकाने आरशासमोर उभे राहून पहावे असेच आहे , तरच आपली दुखंडी प्रतिमा समजून येईल आणि कळेल बाई किती प्रकारे स्वतःलाच मुडपत राहते, डाॅ. योगिता यांच्या या कविता संग्रहातून त्यांची काव्य प्रगल्भता,संवेदनशीलता, स्रीसुलभ भावुकता त्यांच्या अनुभव विश्वाच्या सामर्थ्यातून यथार्थ अल्प शब्दात मांडते. दरम्यान आपल्या या दीर्घ कविता संग्रहाचे स्वागत सृजनवाचक नक्कीच करतील असा विश्वास राजकर यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today