सिंधुदुर्ग today



समतेचं मूल्य समजून घेणे आणि स्वीकारणे महत्वाचे.

संविधान अभ्यासक,

संशोधक राही श्रुती गणेश यांचे प्रतिपादन.

भारताचे संविधान स्वीकृत दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त कार्यक्रम 

सिंधुदुर्ग नगरी (प्रतिनिधी): भारतीय संविधानाने आपलं जगणं अनलाॅक केलं.ब्रिटीशांच्या सत्तेपासून राजकीय स्वातंत्र्य मिळवत असतानाच सामाजिक समतेची संविधानाने कास धरली. इथे प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे विचार करण्याचं, ते विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, असे जाहीर केलं. ' एक व्यक्ती एक मत '  आणि ' एक मत-एक मूल्य ' या सूत्राने आपल्या देशातल्या संपूर्ण जनतेला एका पायरीवर आणलं. संविधानाने राजकीय समता प्रस्थापित केली असली तरी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला दर्जाची आणि संधीची समानता मिळाली पाहिजे. यासाठी समतेचं मूल्य समजून घेणे आणि स्वीकारणे महत्वाचे आहे.असे प्रतिपादन संविधान अभ्यासक, संशोधक आणि लेखिका राही श्रुती गणेश यांनी केले. 

भारताचे संविधान स्वीकृत दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ, मुंबई कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आणि गोवा विभाग अंतर्गत शाखा कुडाळ च्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या. 

राही श्रुती गणेश पुढे म्हणाल्या की, भारतीय संविधान हे आपलं आयकार्ड आहे. संविधान समजून घेण्यासाठी संविधानाची उद्देशिका नीट समजून घेतली तरी पुरेसे आहे. ' आम्ही, भारतीय लोक  ' या शब्दांनी सुरू होणार्‍या एका वाक्यामध्ये या उद्देशिकेत संपूर्ण संविधानाचा आशय सांगितला आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता ,लोकशाही आणि समाजवाद ही मूल्ये म्हणजे भारतीय संविधानाचा गाभा आहे.म्हणूनच संविधानाचे रक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. 

यावेळी विचारमंचावर कुडाळ शाखेचे अध्यक्ष अनिल पावसकर,  ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलताई परुळेकर,समाजसेवक सिद्धार्थ-जाधव परुळेकर, यशोधरा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

कमलताई परुळेकर आपल्या भाषणात म्हणाल्या की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधाच्या रुपाने या देशाला लोकशाहीधिष्टित मानवी मूल्यांची महान देणगी दिली. बंधुता हे लोकशाहीचे दुसरे नाव आहे, असा महान संदेश डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. पण आज संविधानविरोधी कट-कारस्थाने आखले जातात.यासाठी ' घर घर संविधान 'या अभियानांतर्गत प्रत्येकाने संविधान समजून घेणे, त्याचे  रक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे.समाजवादी, धर्मनिरपेक्षता या शब्दांचा व्यापक अर्थ समजून घ्यावा लागेल. धर्मनिरपेक्ष म्हणजे धार्मिकता नव्हे,शासनसत्तेला धर्म नसतो. एकापेक्षा दुसरा श्रेष्ठ शासनसत्ता मानत नसते.असे सांगत आजच्या शासनव्यवस्थेवर आणि निवडणूक आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीवर त्यांनी खेद व्यक्त केला.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल पावसकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात घडलेल्या ठळक घटनांचे मार्मिकपणे दाखले देत भारतीय संविधानाचे महत्त्व, उद्दिष्टे आणि व्याती स्पष्ट केली. उपस्थित सर्वांना संविधान स्वीकृत दिनानिमित्त सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या दरम्यान परूळे येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ जाधव आणि यशोधरा जाधव या उभयतांनी पुरस्कृत केलेल्या संविधानाच्या प्रती विभागातील बुद्धविहारांना आणि  कार्यकर्तांना भेट स्वरुपात वितरित करण्यात आल्या. त्यांच्या या स्तुत्य कार्याबद्दल आणि सिपींग कार्पोरेशन विभागात मॅनेजरपदी सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मुंबईतील कार्यकर्ते राजन जाधव, नाथा चेंदवनकर, प्रेमानंद जाधव, तुकाराम तांबोसकर, नारायण आरोंदेकर, सदानंद पावसकर, स्वाती जाधव, शरद पवार, सुंदर म्हापणकर, सहदेव कदम, कांता जाधव, सुरेश तांबे, श्रद्धा असणकर, कृष्णा गावकर, महेंद्र सावंत,पी. डी. कदम आदी कार्यकर्त्यांना संविधान प्रती भेट स्वरुपात देण्यात आल्या. 

कार्यक्रमानंतर झालेल्या खुल्या चर्चासत्रात व्याख्यात्या राही श्रुती गणेश यांचेशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. यामध्ये महेश परुळेकर, पी. एल. कदम, व्ही.बी. जाधव,अनिल जाधव, अनिल तांबे,रावजी यादव, राजन जाधव, आदी अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर जाधव यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले, आणि आभार सत्यवान कदम यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today