सिंधुदुर्ग today
चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रफुल्ल शिलेदार
१ डिसेंबर रोजी मालवण येथे संमेलनाचे आयोजन
समाज साहित्य प्रतिष्ठान आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजन
कणकवली/प्रतिनिधी
समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ.नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रफुल्ल शिलेदार (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून संत साहित्याचे अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर हे उपस्थित राहणार आहेत. रविवार १ डिसेंबर रोजी स. १० वा.बॅ.नाथ पै सेवांगण मालवणच्या सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण बरोबर महाराष्ट्रातील गुणवंत साहित्यिकांना चांगल्या वाचकांसमोर आणण्याच्या दृष्टीने समाज साहित्य प्रतिष्ठान ही संस्था गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी समाज साहित्य विचार संमेलन आयोजित केले जाते. 'आधी समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते" ही धारणा ठेवून समाज साहित्य प्रतिष्ठानचे उपक्रम राबविले जातात आणि असाच विचार मांडणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करून संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीच्या चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनाच्या अध्यक्षपदी निमंत्रित करण्यात आलेले जेष्ठ कवी अनुवादक आणि संपादक प्रफुल्ल शिलेदार हे नव्वद नंतरच्या पिढीतील महत्त्वाचे कवी आहेतच, परंतु एक भाषांतरकार म्हणून त्यांचा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक आहे.भाषांतरासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.इंग्रजी, हिंदी, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी, कन्नड़, गुजराती, पंजाबी, तेलुगु, ओडीया, स्लोवाक, टर्किश आदी भाषेत त्यांच्या कविता भाषांतरित झाल्या आहेत. युगवाणी या मराठीतील महत्त्वाच्या नियतकालिकाचे ते विद्यमान संपादक आहेत.
संमेलनात आद्य इतिहासकार सिंधुदुर्ग सुपुत्र गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांना तर ज्येष्ठ लेखक जयंत पवार पुरस्काराने कादंबरीकार संग्राम गायकवाड यांना त्यांच्या मनसमझावन या कादंबरीसाठी आणि प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्काराने कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहासाठी गौरविण्यात येणार आहे.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवयित्री मनीषा शिरटावले यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री नीलम यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रित कवींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनासाठी कोकण बरोबर महाराष्ट्रातील जुन्या नव्या कवींना कविता वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तरी साहित्य रसिकांनी या संमेलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाह सुरेश बिले आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर यांनी केले असून अधिक माहितीसाठी संपर्क नंबर - 97649 64405 -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा