सिंधुदुर्ग today



आजच्या दगाबाज काळात अल्पसंख्याक भेद शोधणाऱ्या कवीचा गौरव

कवी सफरअली यांना प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात श्रीधर चैतन्य यांचे प्रतिपादन

कणकवली प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन : कार्यक्रमाला जिल्ह्याभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली/प्रतिनिधी

         आजच्या दगाबाज काळात अल्पसंख्याक भेद शोधणारा कवी म्हणून आपल्याला सफरअली इसफ आणि त्यांच्या कवितेकडे पहावे लागते. त्यांची कविता धर्माच्या मदतीने राजकारण केले जाणारी मांडणी टोकदारपणे करते आणि आजच्या धर्मांध राजकारणाला  उघडे पाडते. अशा समकालीन महत्त्वाच्या कवितेला कणकवलीच्या प्रभा प्रकाशनातर्फे प्रभा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक - अनुवादक श्रीधर चैतन्य यांनी येथे आयोजित केलेल्या प्रभा प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात केले.

   कणकवली - कलमठ गोसावीवाडी येथील अक्षय सभागृहात कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आजच्या बहुचर्चित 'अल्लाह ईश्वर' या काव्यसंग्रहासाठी प्रभा प्रेरणा पुरस्कार श्रीधर चैतन्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्ह्याभरातून रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाच्या मंचावर समीक्षक प्रा. संजीवनी पाटील, समाज सांस्कृतिक कार्यकर्ते ॲड. विलास परब, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रा. सीमा हडकर, प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर आदी उपस्थित होते.

        प्रा. संजीवनी पाटील म्हणाल्या,अल्लाह ईश्वर’ काव्यसंग्रहातील कविता म्हणजे एक वर्तमानकालीन समाजचित्रण आहे. ज्या चित्रणात दहशतीखाली जगत आपल्याला देशभक्तीचे पुरावे पुन्हा-पुन्हा सादर करावे लागतात. या वर्तमानाची ही खंत आणि वेदना वेगवेगळ्या अनुभवांतून व्यक्त होते. खंत आहे ती  आपल्या निष्ठेवर संशय घेतल्याची आणि वेदना आहे ती की आपण इथले असूनही उपरे होत जाऊ याची.  तरीही ‘होय, मी मुसलमान आहे’ असे कवी ठणकावून सांगतो. कारण त्याची देशभक्ती ही निस्सीम भक्ती आहे. अशा कवितेचा प्रभा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ही चांगली घटना आहे.

    ॲड. विलास परब म्हणाले, सफरअली यांची अल्लाह ईश्वर मधील कविता मी वाचली आणि अंतर्मुख होत गेलो. या समाजाचा घटक म्हणून मला संकोच वाटत राहिला. एखाद्या विशिष्ट समूहाला बाहेर फेकण्याची कृती ही त्या समूहाला प्रचंड दुःख देणारी असते. ही वेदना अल्लाह ईश्वर मधील प्रत्येक कवितेत व्यक्त झाली आहे. तरीही कवीचा कुठल्याही समाजावर राग नाही. एवढी मोठी सहृदयता बाळगण्यासाठी मुळात मनच मोठे असावे लागते. असे स्वच्छ मन सफरअली यांचे असल्यामुळेच त्यांची कविता धर्माधर्मामध्ये समन्वय साधते. हे या कवितेचे महत्त्वाचे मोल आहे. संध्या तांबे म्हणाल्या, सुमारे 30 वर्ष सफरअली यांची कविता मी वाचत आली आहे. सफर यांनी ज्या परिस्थितीला सामोरे जाऊन कविता लिहिली त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. संघर्षातून वाटचाल केल्यामुळेच आज एवढा मोठा सन्मान त्यांच्या कवितेला प्राप्त होत आहे.श्री मातोंडकर म्हणाले, सफरअली यांच्या अल्लाह ईश्वर पर्यंतच्या कवितेचे आम्ही साक्षीदार आहोत. अशा आमच्या जवळच्या कवी मित्राचा प्रभा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव होतो हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी पारकर यांनी केले.प्रस्तावना अजय कांडर यांनी केली. प्रा सीमा हडकर, सत्यवान साटम, शिल्पा परब आदींच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

    समाज जाणिवांचं बहरलेले कविसंमेलन

    यावेळी कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात समाज जाणिवांच्या कविता सादर करण्यात आल्या. ॲड. मेघना सावंत यांनी सूत्रसंचालन केलेल्या कवी संमेलनात ऋतुजा सावंत भोसले, डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, कल्पना बांदेकर, प्रमिता तांबे, आर्या बागवे, पल्लवी शिरगावकर, मधुकर मातोंडकर, किशोर कदम, सत्यवान साटम, हरिश्चंद्र भिसे, रामचंद्र शिरोडकर, श्रवण वाळवे, संदीप कदम, संगीता पाटील, संतोष जोईल, एन.आर हेदुळकर आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today