सिंधुदुर्ग today

 


अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच' दीर्घ कवितेची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद


ज्येष्ठ कवी प्रा.डॉ.दासू वैद्य यांच्या हस्ते 'युगानुयुगे तूच' च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन


छ.संभाजीनगर येथील प्रकाशन सोहळ्याला अनुवादक प्रा. सुधाकर शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती



कणकवली/ऋषिकेश मोरजकर

       कवी अजय कांडर हे माझ्या पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. मराठीत दीर्घ कविता लिहिल्या गेल्या आहेत.कांडर यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील 'युगानुयुगे तूच' या दीर्घ कवितेलाही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.आता या कवितेचा हिंदी अनुवादक प्रा.डॉ.सुधाकर शेंडगे यांनी 'युग युग से तू ही' या शीर्षका अंतर्गत केला. ही 'युगानुयुगे तूच'ची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. दासू वैद्य यांनी छ.संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे केले.

      कवी अजय कांडर यांच्या लोकवाड:मय गृह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'युगानुयुगे तूच' या दीर्घ कवितेचा प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे यांनी अनुवादित केलेल्या आणि दिल्ली वाणी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'युग युग से तू ही' या हिंदी अनुवाद काव्यग्रंथाचे प्रकाशन प्रा.वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. संभाजीनगर येथे प्रगतिशील लेखक संघ आणि विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्याला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते समीक्षक प्रा. डॉ. पी विठ्ठल, अनुवादक प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे, कवी अजय कांडर, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.समाधान इंगळे आदी उपस्थित होते.

         प्रा.डॉ. पी विठ्ठल म्हणाले, 'युगानुयुगे तूच' कविता वाचल्यावर कवीच्या विशिष्ट अशा जीवनदृष्टीचा, भूमिकेचा प्रत्यय वाचकाला येतोच. कारण समकाळातील एकूणच कोलाहल बघता इतक्या धीटपणे भूमिका घेऊन लिहिणे सोपे नाही. हे धाडस अजय कांडर यांनी केले आहे, ते कौतुकास्पद आहे. सहानुभूतीच्याही पलीकडे जाऊन कवी आपल्या कवितेतून आंबेडकरांच्या व्यापक जीवनदृष्टीचा आणि त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्याचा आलेखच वाचकांच्या डोळ्यापुढे कवी उभा करतो.बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेचाही अत्यंत सखोल अभ्यास करून त्या संदर्भात मुलगामी लेखन केले आहे. त्यांचा हा विचार या कवितेच्या केंद्रस्थानी कवीने ठेवलेला आहे.लेखन ही एक सामाजिक कृतीच असते’, या  अर्थानेही या कवितेकडे बघता येईल. कारण ही कविता वाचकांना सामाजिक, राजकीय अराजकाची, अंत:कलहाची जाणिव करून देतानाच डॉ. आंबेडकर यांचे थोरपण अधोरेखित करते.

   प्रा.शेंडगे म्हणाले,कवी कांडर यांच्याशी कोणतीही ओळख नसताना त्यांच्या कविता मला आवडतात म्हणून मी त्यांच्या कविता अनुवाद करत आलो.युगानुयुगे तूच ही बाबासाहेबांवरील दीर्घ कविता मी प्रथम वाचली ही कविता राष्ट्रीय पातळीवर गेली पाहिजे.त्यामुळेच मी युगानुयुगे तूचचा हिंदी अनुवाद केला.हा अनुवाद वाणी प्रकाशन सारख्या हिंदीतील विख्यात प्रकाशनाकडून यावा असे वाटत होते. वाणी प्रकाशनाला सुद्धा 'युग युग से तू ही ' आणि 'युगानुयुगे तूच' ही कविता आवडली आणि अवघ्या काही महिन्यात या कवितेचा हिंदी अनुवाद प्रकाशित केला. सदर कविता बाबासाहेबांचं चरित्र सांगत नाही तर बाबासाहेबांचे विचार व्यक्त करतात .बाबासाहेब हे एका कुठल्या समाजासाठी काम करत नव्हते ते संपूर्ण समाजाचा विचार करून कार्यरत होते. याचीच मांडणी युगानुयुगे तूच मध्ये कवी कांडर यांनी केली आहे. मराठीत या संग्रहाच्या एका वर्षात तीन आवृत्या प्रसिद्ध झाल्या आणि आता हिंदी अनुवादालाही देशभर वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कवी कांडर यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

हार्डबाउंड आवृत्ती 

अल्पकाळात संपली

  यावेळी बोलताना युगानुयुगे तूच चे अनुवादक प्रा.डॉ. शेंडगे यांनी युगानुयुगे तूचच्या हिंदी अनुवादाची हार्डबाउंड आवृत्ती अल्पकाळात संपली असल्याची माहिती दिली. चांगलं लेखन असेल तर अनुवादाच्या माध्यमातून ते लेखन राष्ट्रीय पातळीवर पोहोचते आणि त्या लेखनाला देशभर चांगला प्रतिसाद मिळतो. याचे उत्तम उदाहरण म्हणून युगानुयुगे तूचच्या 'युग युग से तू ही' या अनुवादाकडे पाहता येईल असेही त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today