सिंधुदुर्ग today
उतरत्या वयातील काव्य लेखनाने जगण्याची समृद्धी - कवी अजय कांडर
कवी हरिचंद्र भिसे यांच्या 'संदेश ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
डॉ.योगिता राजकर, मधुकर मातोंडकर, प्रा.अन्वर खान आदी मान्यवरांचा सहभाग
बांदा /प्रतिनिधी
कवी हरिचंद्र भिसे यांनी निवृत्तीनंतर काव्य लेखनाला प्रारंभ केला. एवढेच नाही तर त्यांचा आता 'संदेश' काव्यसंग्रहही प्रकाशित होत आहे. त्यांची कविता निसर्गाबरोबरच मानवी दुःखाला भिडते आणि समाज व राजकीय अनिष्ट प्रथांवर आसूड ओढते. उतारत्या वयात त्यांची अशी कविता लिहिण्याची ही उर्मी त्यांचं जगणं समृद्ध करणारी आहे. असे प्रतिपादन नामावंत कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांनी बांदा येथे केले.
कवी हरिचंद्र भिसे लिखित प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'संदेश ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी अजय कांडर यांच्या हस्ते बांदा सोसायटीच्या सभागृहात झाले. प्रा अन्वर खान यांच्या अध्यक्षतेखाली आणि वाई येथील प्रसिद्ध कवयित्री - ललित लेखिका डॉ. योगिता राजकर, कवी मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात बोलताना कवी कांडर यांनी कवी भिसे हे निसर्गाचे महत्त्व आपल्या कवितेतून सांगताना दुसऱ्या बाजूला आजच्या सामाजिक वास्तवावर कठोरपणे टीका करतात आणि माणसाने उत्तम जगण्यासाठी आपल्यातली माणुसकी सोडू नये असे आवाहनही करतात असेही आग्रहाने सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, कवी हरिचंद्र भिसे, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, एम् डी धुरी ,सुधाकर देसाई ,जगन्नाथ परब , शिवराम गाड , विठ्ठल देसाई , तुकाराम सावंत, तुळशीदास धामापूरकर , उत्तम राऊळ , महादेव बांदेकर, शंकर नार्वेकर आदी उपस्थित होते.
डॉ.राजकर म्हणाल्या संदेश काव्यसंग्रहातील कविता विविध प्रकारची निसर्गचित्रे आपल्यासमोर उलगडत नेतात तर दुसऱ्या बाजूला सामाजिक,राजकीय,पर्यावरणीय भान देणाऱ्या कवितांचा या काव्यसंग्रहात समावेश करण्यात आला आहे.माणसातील हरवत चाललेली ओल, हरवत चाललेली माणुसकी, प्रेम याबाबतचे चिंतन या काव्यसंग्रहात आलेले असून निसर्गाला जपुया,माणसांशी जोडून राहूया,जंगलतोड करू नका असे सामाजिक संदेशही भिसे यांची ही कविता देते.
श्री मातोंडकर म्हणाले, कविला नेहमीच्या जगण्यातून जाणवलेला अनुभव आणि लोकांना, समाजाला काहीतरी अनिष्ट बाबींची पूर्व कल्पना देण्याची झालेली तीव्र इच्छा या उदात्त हेतूने या कविता लिहिल्या गेल्या आहेत. कवितासंग्रहाची अप्रतिम निर्मिती झाली असून संग्रह हातात घेतल्या घेतल्या त्यातील कविता वाचाव्याशा वाटतात. तुम्ही थोडा धोका पत्करून निराश न होता एका ध्येयाने मार्गक्रमण करत राहिलात तर कोणतेही यशाचे शिखर गाठता येते आणि ध्येय पूर्तीचा आनंद मिळतो.असा संदेशही कवी भिसे यांनी आपल्या कवितांमधून दिला आहे.
यावेळी अन्वर खान यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. हरिचंद्र भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी कवी भिसे यांचा विविध स्तरात सत्कार करण्यात आला.हनुमंत मालवणकर यांनी निवेदन केले तर गुरूनाथ नार्वेकर यांनी प्रस्ताविक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा