सिंधुदुर्ग today

ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे निधन

कणकवली/प्रतिनिधी

     मूळ कणकवली - ओसरगाव येथील आणि मुंबई येथे पत्रकार म्हणून कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण (५३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नितीन चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.दरम्यान सिंधुदुर्गातील त्यांच्या साहित्य परिवारातील कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कवी अजय कांडर, पत्रकार संजय परब, मधुकर मातोंडकर, ॲड.विलास परब,ॲड. देवदत्त परुळेकर, विलास कोळपे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

        कोकणी माणूस आणि मालवणी भाषा यावर विशेष प्रेम असणारे नितीन चव्हाण हे गेली २७ वर्षे पत्रकारितेत अतिशय तळमळीने कार्यरत होते. गरिबांच्या, वंचितांच्या वेदना, सामान्य नागरिकांच्या जगण्याचे प्रश्न ते लेखनातून मांडत असत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत पुढे आलेले नितीन चव्हाण शोध पत्रकारितेसाठी प्रसिद्ध होते. मागील वीस वर्षापासून ते मुंबई महानगरपालिकेचे वार्तांकन करत होते. गेली चौदा वर्ष महाराष्ट्र टाइम्स मध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. मात्र त्यापूर्वी त्यांनी दैनिक तरुण भारत, दैनिक सामना, दैनिक सकाळ मध्ये काम करताना आपली स्वतःची नाममुद्रा उमटवली होती. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, नागरी आदी विविध विषयावर विपुल लेखन केले. विशेषत: गिरणी कामगारांचे प्रश्न आणि मुंबई नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यावर त्यांनी आपल्या पत्रकारितेतून आवाज उठवला. परखड भूमिका मांडणारे लेखन हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कामगार, झोपडपट्टीवासी, दलितोद्वार, भाडेकरू, मुंबईतील मैदाने या विषयातील त्यांच्या लेखनासाठी त्यांना मुंबई पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या तू. कृ.सरमळकर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

     त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today